गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याने दिलासा असतानाच आता सालेकसा, देवरी व सडक-अर्जुनी हे ३ तालुके ग्रीन झाले असल्याची गूड न्यूज जिल्हावासीयांसाठी आहे. त्यानंतर आता गोरेगाव, आमगाव व अर्जुनी-मोरगाव हे तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून त्यांना काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे. जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णांची संख्या ७५ झाली आहे.
दिवाळीनंतरच जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात दिसून येत होती. सुदैवाने हा क्रम अद्याप सुरूच असून त्यानंतर आता जिल्ह्यात कोरोना नक्कीच नियंत्रणात आला असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. यामुळेच जिल्ह्यातील सालेकसा, देवरी व सडक-अर्जुनी व तालुका कोरोनामुक्त झाले आहेत. गोरेगाव तालुक्यात १, आमगाव तालुक्यात १ तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २ क्रियाशील रुग्ण उरले असून लवकरच हे ३ तालुकेही कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहेत.
-----------------------
गोंदिया व तिरोडा हॉटस्पॉटच
जिल्ह्यातील ३ तालुके कोरोनामुक्त झाले असून आणखी ३ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. असे असताना मात्र गोंदिया व तिरोडा तालुका मात्र आजही हॉटस्पॉट कायम आहेत. गोंदिया तालुक्यात आजही ५४ तर तिरोडा तालुक्यात १५ क्रियाशील रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, दररोजच्या आकडेवारीत गोंदिया व तिरोडा तालुक्यात बाधितांची भर पडताना दिसत आहे. यामुळे कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येणे गरजेचे झाले आहे.
--------------------------------
मास्कचा वापर अनिवार्य
राज्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसत असतानाच अमरावती येथे कोरोनाचा कहर सुरूच आहे. यावरून केंद्रीय समितीने विदर्भाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अशात जिल्ह्यातून कोरोनाला हाकलून लावण्यासाठी मास्कचा वापर व शारीरिक अंतराचे पालन अनिवार्य झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करण्याचे आदेशही काढण्यात आले आहे.