सालेकसा : तालुक्यात कोविड-१९ लसीकरणाचे काम प्रगतिपथावर असून तालुक्यातील १८ वर्षावरील सर्व पात्र नागरिकांमध्ये ७४.४५ टक्के लोकांना कोविड-१९ ची लस देण्यात आली. शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त झाला असून दुसरीकडे आरोग्य विभाग गावागावात शिबिर लावून लसीकरण करून लोकांचे जीवन सुरक्षित करण्याचे काम करीत आहे.
तालुक्याची एकूण लोकसंख्या ९४ हजार ६५४ एवढी आहे. त्यापैकी अठरा वर्षाखालील लोकांना वगळले तर एकूण ६८ हजार ५०४ लोक जे १८ वर्षावरील आहेत. त्यांना लस देण्याची गरज आहे. त्यापैकी आतापर्यंत ५१ हजार ४ नागरिकांना लस देण्यात आली आहे. अर्थात ७४.४५ टक्के लोकांना कोविशिल्ड किंवा कोवॅक्सीन लस दिली. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एक ग्रामीण रुग्णालय सालेकसा मिळून केलेल्या लसीकरण मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध अंतर्गत १२ हजार ६३९ तर प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत ११ हजार ३३३ लोकांना बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १० हजार ३२९ लोाकांना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत एकूण १० हजार २९५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या शिवाय तालुकास्थळी ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे ६५०८ लोकांना लस देण्यात आली आहे. तालुक्यातील एकूण १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यात आली. एकूण ६०० फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण करण्यात आले. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील एकूण १६ हजार १०७ लोकांचे लसीकरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे एकूण केलेल्या लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचारी ७०६, फ्रंटलाईन वर्कर २३५८, १८ ते ४४ वयोगटाचे १६०८, ४५ ते ६० वयोगटाचे १४४० आणि ७६५ लोकांना लस देण्यात आली. १८ ऑगस्ट २०२१ पर्यंत येथे ४८८२ लोकांना पहिला डोस आणि १९९५ लोकांना दोन्ही डोस देण्यात आले.
............
‘सालेकसा तालुक्यातील लोकसंख्या इतर तालुक्याच्या तुलनेत सर्वात कमी असून जिल्हा आरोग्य विभागाकडून कमी पुरवठा केला जातो. त्यानुसार तालुक्यात लसीकरण होत आहे. परंतु तालुक्यात लसीकरणाची टक्केवारी जास्त असून वाया जाणाऱ्या डोसचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात तालुका अग्रेसर आहे.
-डॉ. अमित खोडणकर, तालुका आरोग्य अधिकारी, सालेकसा