रावणवाडी : पावसाळा सुरू होण्याचे संकेत मृग नक्षत्रापासून मिळते. यावर्षी पाऊस लांबला असला तरी आता कधीही पाऊस येण्याची शक्यता पाहता घराच्या छपरांची डागडुजी करण्यांसोबतच पावसापासून बचाव करता यावा यासाठी प्लास्टिकच्या ताडपत्र्यांच्या खरेदीला वेग आला आहे.वेधशाळेच्या अंदाजानुसार विदर्भात पावसाला सुरुवात झाली असून घराच्या छपरांची डागडुजी युद्धस्तरावर केल्या जात आहे. पावसापासून घराचे संरक्षण करण्यासाठी काही घरावर परंपरागत मातीचे कौल, इंग्रजी कौल, टिनपत्रे यासह प्लास्टिक ताडपत्र्यांचा वापर केला जातो. बहुतांश गरीब व सामान्य कुटुंबात परिस्थितीमुळे मातीचे कौल टाकणेसुद्धा बिकट असते. अशावेळी पावसापासून बचाव करता यावा यासाठी प्लास्टिकच्या ताडपत्र्या कुडामातीच्या घरावर टाकून कशीबशी पावसाळ्यापासून सुटका केली जात आहे. पावसाचे वेध लागताच प्लास्टिक ताडपत्र्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी दुकानावर पहावयास मिळते. प्लास्टिक ताडपत्र्यांची विक्री लक्षात घेता दुकानदारांनी विविध रंगात ताडपत्र्या विक्रीस आणल्या आहेत.पिवळया, काळ्या, पांढऱ्या, निळ्या रंगातील या प्लास्टिक ताडपत्रीला १४० ते १५० रुपये प्रतिकिलो मोजावे लागतात. काळ्यापेक्षा पांढऱ्या प्लास्टिक ताडपत्र्या खरेदी करणाऱ्यांवर ग्राहकांचा कल असल्याचे दिसते. तडाख्याने विकल्या जाणाऱ्या प्लास्टिक ताडपत्री व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली. प्लास्टिक ताडपत्रीचा वापर केवळ घर किंवा छतापुरता मर्यादित नसून शेतकरी आपल्या मालाचा पावसापासून बचाव करण्यासाठी सुद्धा करतात. पावसाच्या आगमनापूर्वीच रस्त्याच्या कडेला असलेले फळ विक्रेते, पानठेले, हातगाडी चालक, पालेभाजी विक्रेते यांच्यासह फुटपाथावर व्यवसाय करणारे सुद्धा या प्लास्टिक ताडपत्र्या खरेदी करताना दिसू लागले आहेत. मागील वर्षापेक्षा यावर्षी प्लास्टिकच्या ताडपत्र्यांचे दर प्रतिमिटर पाच ते दहा रुपयाप्रमाणे वाढले आहे. (वार्ताहर)
प्लास्टिक ताडपत्र्यांची विक्री जोरात
By admin | Published: June 26, 2016 1:40 AM