कपिल केकत
गोंदिया : दिवसभर राबलेल्या शरीराला उत्तम झोप मिळाली तरच दुसऱ्या दिवशी शरीर त्याच जोमाने कामाला लागते. मात्र असे न झाल्यास दुसरा दिवस थकव्याचा किंवा विविध शारीरिक तक्रारींचाच जातो. कारण झोप व शरीर यामध्ये असलेले चक्र थोडेफारही विस्कटल्यास तेथूनच विविध आजारांची दारे उघडतात. यामुळे पुरेपूर झोप घेणे शरीरासाठी तेवढेच आवश्यक असून उत्तम आरोग्याचा हा मंत्र जपणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा तेवढीच मजबूत असते.
--------------------------
अपुऱ्या झोपेचे तोटे
- झोप पूर्ण न झाल्यास एंग्जायटी, डिप्रेशन आदी मानसिक आजार जडतात यामुळे पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे.
- झोप पूर्ण न झाल्यास शरीराला थकबा जाणवतो तसेच स्मरणशक्तीही कमी होते.
- जास्त दिवस झोप पूर्ण न घेतल्यास यातून विविध आजार जडतात यामुळे ठराविक वेळेत पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे.
-------------------------------
रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराची ढाल (बॉक्स)
दिवसा काम तर रात्रीला झोप हे चक्र शरीरासाठी ठरवून देण्यात आले आहे. यामुळे शरीरात विशिष्ट पदार्थ तयार होत असून तो दिवसभर आपल्याला काम करण्यासाठी प्रेरित करतो. मात्र रात्रीला थकलेल्या शरीराला झोपही तेवढीच गरजेची आहे. असे न केल्यास हे चक्र विस्कटते व दुसऱ्या दिवशी आपले शरीर काम करण्यास प्रतिसाद देत नसून थकवा जाणवतो. यातून आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे पुरेपूर झोप हा उत्तम आरोग्याचा मंत्र आहे.
०-----------------------------
संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक
शरीरासाठी संतुलित आहार व व्यायाम हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. यासाठी सर्वप्रथम आपल्या झोपण्याची वेळ ठरवून घ्यावी. दररोज अर्धा ते पाऊण तास घराबाहेर पडून व्यायाम करावा. दिवसा झोपू नये, फक्त अर्धा तास शरीराला आराम द्या. वेळेवर जेवण व भरपूर पाणी प्यावे. सायंकाळी ६ वाजतानंतर चहा-कॉफी नको. तसेच रात्रीला अधिक मसालेदार व तैलीय पदार्थ टाळावे. तसेच बेडरूममध्ये कधीही टीव्ही ठेवू नये.
------------------------
किमान सात तास झोप आवश्यक
शरीराला जसे जेवण आवश्यक आहे तसेच झोपही तेवढीच गरजेची आहे. यात, ६-१२ वयोगटासाठी ९ ते १२ तास, १३-१८ वयोगटासाठी ८-१० तास, १८-६० वयोगटासाठी ७ व त्यापेक्षा जास्त तर ६१- ६४ वयोगटासाठी ७-९ तासांची झोप असल्याचे डॉक्टर्स सांगतात.
--------------------------------
पुरेपूर झोप गरजेची
दिवसभर काम केल्यानंतर रात्री आपोआपच शरीराला थकवा जाणवतो व हा थकवा काही खाल्ल्यानंतरही जात नाही. कारण, शरीरासाठी दिवसभर काम व रात्रीला झोप असे चक्र ठरले आहे. हे चक्र थोडेफारही विस्कटल्यास तेथूनच शरीराला आजार जडण्यास सुरुवात होते. यामुळे पुरेपूर झोप उत्तम आरोग्यासाठी तेवढीच गरजेची आहे.
- डॉ. शिबू आचार्य
मानसिक रोगतज्ज्ञ
------------------------------------
वयोगटानुसार किमान झोपेचे तास
०-३ महिने --२१-२२
४-११ महिने-- २१-२२
१-२ वर्ष--९-१५
३-५ वर्ष -- ९- १२
६-१३ --९-१२
१४-१७ --८-१०
१८-६० -- ७ व जास्त
६५ व पुढे -- ७-९