गोंदिया : देशात व राज्यात ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत केला जाणार आहे. नागपूर ते गोंदिया हे अंतर केवळ एका तासाचे असणार आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोलीलासुद्धा जाणार आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून, याचा खूप मोठा फायदा धान उत्पादक व निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त गुरुवारी येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिवंगत मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून झाले. अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल होते. यावेळी मंचावर ‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, जेएसडब्ल्यू समूहाचे चेअरमन सज्जन जिंदल, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, मनोग्राॅफचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप शाह उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले, मनोहरभाई पटेल यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. ज्यावेळी केवळ सहा ते दहा टक्के लोक साक्षर होते त्या काळात एकाच वेळी २२ शाळा व दोन महाविद्यालये सुरू करून त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळेच आज एक संपूर्ण पिढी शिक्षित झाली असल्याचे ते म्हणाले. खा. पटेल यांनी प्रास्ताविक केले, तर माजी आमदार राजेंद्र जैन व आशावरी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
विद्यार्थ्यांनो आई-वडिलांची सेवा करा : जॅकी श्रॉफ सध्याचे युग हे यंत्राचे युग आहे. आजची तरुण पिढी ही डोक्याखाली मोबाइल घेऊन झाेपते. आई-वडील त्यांच्या भल्याचे सांगतात. मात्र, त्याकडे ते दुर्लक्ष करतात. हे चुकीचे आहे, आई-वडिलांचा आदर आणि सेवा करा, पुस्तकांशी मैत्री करा, भरपूर अभ्यास करा, असा सल्ला अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षण व सिंचन क्षेत्रात मनोहरभाई पटेल यांचे योगदान महत्त्वपूर्ण : विजय दर्डा‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा म्हणाले, स्व. मनोहर पटेल हे एका साधारण कुटुंबातून होते. ते दूरदृष्टी बाळगणारे होते. १९५० मध्ये जेव्हा गोंदिया-भंडारा जिल्ह्यात सिंचन आणि शिक्षणाची सोय नव्हती तेव्हा त्यांनी त्या सुविधा उपलब्ध करून देत सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून १ लाख ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, देशाचे भविष्य घडवीत आहेत. विमान वाहतूक क्षेत्रात खा. प्रफुल्ल पटेल यांनी केलेले कार्य खरोखरच अतुलनीय आहे, असे सांगून ते म्हणाले, असा महान नेता गोंदिया-भंडारा जिल्ह्याला मिळाला असून, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी जिल्हावासीयांची आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस हे जिथे जातात तिथून ते काही तरी नक्की घेऊन जातात, असा टोलाही दर्डा यांनी लगावला.