बोंडगावदेवी : समूह बचत गटातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी. ग्रामीण भागातील महिलांनी उद्योगाची कास धरून स्वत:सह कुटुंब व समाजाचा आर्थिक विकास साधावा यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद तालुका व्यवस्थापन कक्ष अर्जुनी मोरगावच्यावतीने तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या साहाय्याने तालुक्यातील महिला बचत समूहांना ५ कोटी २५ लाखाचे कर्ज साहाय्य वितरण आयोजित बँक कर्ज वितरण मेळाव्यात करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापन कक्ष, बँक ऑफ बडोदा, शाखा अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समूह से समृद्धी’ बँक कर्ज वितरण मेळाव्याचे गुरुवारला (दि.२६) करण्यात आले होते. अर्जुनी मोरगाव येथील वात्सल्य सभागृहात आयोजित मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बँक ऑफ बडोदाचे पूणे भागाचे महाप्रबंधक मनीष कोरा, सहायक महाप्रबंधक क्षेत्रीय प्रमुख संजीव सिंह, उपक्षेत्रीय प्रमुख मुख्य प्रबंधक अनिसकुमार, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक मनीषकुमार पटले, शाखा व्यवस्थापक राहुल शेंडे, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक रेशीम नेवारे, नवेगावबांधचे बँक व्यवस्थापक रवी मानवटकर उपस्थित होते. ग्रामीण भागातील महिलांना उद्योग जगतात सहभागी करून स्वयंरोजगार करण्यासाठी बँकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गावातील एक महिला उद्योग, व्यवसायासाठी पुढे आली तर अख्या गाव प्रगतीपथावर पुढे जातो. नियमित कर्ज परतफेड केल्यास बँकेत त्या महिला समूहाची पत निर्माण होते, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. याप्रसंगी उमेद अभियानातील तालुक्यातील स्वयं सहाय्यता समूहांना ५ कोटी २५ लाख रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राहुल शेंडे यांनी केले, तर आभार उमेदचे तालुका व्यवस्थापक रेशीम नेवारे यांनी मानले. मेळाव्याच्या आयोजनासाठी तालुका व्यवस्थापक रिता दडमल, तालुका समन्वयक कोविदकुमार रंगारी, संतोष शहारे, प्रकाश मेश्राम, प्रवीण रामटेके, दिनेश भेंडारकर, तुळशीदास मेश्राम यांनी सहकार्य केले.