पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट : विषय नियोजनात असल्याचे आश्वासन आमगाव : येथील रूग्णालयाच्या प्रशस्त इमारतीत उपजिल्हा रूग्णालय मंजूर करण्यात यावे या मागणीला घेऊन जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची भेट घेतली. याभेटीत नामदार सावंत यांनी आमगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाची मागणी नियोजनात असल्याचे सांगीतले. सालेकसा अतिदुर्गम आदिवासी परिक्षेत्र मकरडोह, डंडारी, चांदसूरज व लबाडधारणी, देवरी तालुक्यातील अलेवाडा, कडीकसा, ककोडी, महसुली, मकरडोह, पींडकेपार, जेठभावडा, इस्तारी सह ५५ लोकवस्तीतील आरोग्य सेवा जल्द व अद्यावत देण्यासाठी जिल्हापातळीवरील रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. तसेच आमगाव तालुक्यातील घाटटेमनी, मुंडीपार, सोनेखारी, वळद, फुक्कीमेटा या लांब अंतरावरील लोकवस्तीतील आरोग्य सेवा इतर सोईवर अवलंबून आहे.सदर तीन तालुक्यांसह राज्याच्या सिमेवर अतिदुर्गम भागात असणाऱ्या नागरिकांना जलद व सुविधायुक्त रुग्णसेवा मिळावी यासाठी येथील प्रशस्त इमारतीत उपजिल्हा रुग्णालय शासनाने मंजूर करावे यासाठी नागरिकांच्या वाढत्या मागणीला पुढाकऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. तर उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीला शासनस्तरावर गती मिळावी याकरिता शिवसेना जिल्हा अध्यक्ष मुकेश शिवहरे, भाजप ओबीसी जिल्हा महामंत्री यशवंत मानकर, भाजप शहर अध्यक्ष धनंजय वैद्य, राजीव फुंडे, नितेश दोनोडे, निमेश दमाहे, उत्तम नंदेश्वर, शालिनी बहेकार यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेतली.यावेळी ना.सावंत यांनी, रुग्णसेवेसाठी शासन कार्यान्वीत करीत आहे. सर्वांपर्यंत आरोग्याची सेवा मिळेल यासाठी नवीन योजनांना अधिक गती देण्यात येत असून आमगाव उपजिल्हा रुग्णालयाची मागणी नियोजनात असल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. (शहर प्रतिनिधी)
उपजिल्हा रूग्णालयासाठी आरोग्यमंत्र्यांना साकडे
By admin | Published: June 11, 2016 2:13 AM