गोंदिया : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी राज्यातील सात जिल्ह्योसाठी नवीन शिवभोजन केंद्रांना मंजुरी दिली आहे. यात गोंदिया जिल्ह्यासाठी १८ तर भंडारा जिल्ह्यासाठी १५ अशा एकूण ३३ शिवभोजन केंद्रांना मंजुरी दिली आहे. यामुळे गरजवंतांना नि:शुल्क भोजन मिळण्यास मदत होणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची सर्वाधिक गैरसोय झाली आहे. तर अनेकांच्या हाताला काम नसल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, अशा लोकांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून नि:शुल्क जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील गरजवंतांची होणारी परवड पाहून खा. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढविण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी गोंदिया जिल्ह्यासाठी १८ व भंडारा जिल्ह्यासाठी १५ अशा एकूण ३३ शिवभोजन केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील गरजवंतांना मदत होणार आहे. माजी आ. राजेंद्र जैन यांनीसुध्दा यासंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला हे विशेष.