तिरोडा : रेती घाटांचे लिलाव न झाल्याने घरकुल लाभार्थी अडचणीत आले होते. त्यांची अडचण दूर करण्यासाठी शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध देण्याचा निर्णय घेतला. मात्र या आदेशाची अंमलबजावणी केली जात नव्हती. यानंतर खनिकर्म विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर मांडवी घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे वितरण करण्यास सुरुवात करण्यात आली.
पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याकरिता मांडवी घाट राखीव ठेवण्यात आले. पण स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रेतीघाट मंजूर असून, सुद्धा मोफत रेती वाटप बंद होते. लाभार्थ्यांनी मागणी करून सुद्धा हा रेतीघाट सुरू करण्यात आला नव्हता. याचीच दखल रविकांत (गुड्डू) बोपचे यांनी खनिकर्म विभागाकडे प्रत्यक्ष पाठपुरावा केला. त्यानंतर मांडवी रेतीघाटाची प्रत्यक्ष चौकशी केली. मांडवी घाटाकडे जाणारा रस्ता चांगला नव्हता व रस्त्याच्या मध्ये पाइप फुटले असल्यामुळे रेतीची वाहतूक करता येत नव्हती. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करून रेतीचे वितरण करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर हा रस्ता दुरुस्ती करून दि. २४ फेब्रुवारीपासून मांडवी रेती घाटावरून रेतीचे घरकुल लाभार्थ्यांना वितरण करण्यास सुरुवात झाली. घरकुल लाभार्थ्यांना पिपरिया व मांडवी असे दोन घाट रेतीकरिता उपलब्ध झाल्यामुळे हजारो लाभार्थ्यांची अडचण दूर झाली आहे.