गोंदिया : कमी जागेतून रेती उपशाची परवानगी देऊन जास्त रेती उपसा करणाऱ्या रेती माफियांना खनिकर्म अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी/मोरगाव येथील शासकीय गट क्र. २३६ आराजी १०.४० हेक्टर आर पैकी खनिकर्म अधिकाऱ्यांनी एका कंत्राटदाराला ०.१५ हेक्टर आर जागेतून रेती उत्खनन करण्याची परवानगी चार वेळा दिली होती. परंतू सदर कंत्राटदाराने अतिरिक्त उत्खनन केल्याचे लक्षात आल्यानंतर सूज्ञ नागरिकांनी याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचा आदेश दिला. मात्र अधिकाऱ्यांनी पंचनामा करताना कंत्राटदाराचे हित जोपासत एकूण १०.४० आरपैकी केवळ एकदाच परवानगी दिलेल्या ०.१५ आर जागेचा पंचनामा केला. त्यामुळे या ठिकाणी ३५.६ ब्रास गौणखनिज चोरी झाल्याचे बोलले जात आहे.पंचनाम्यात ७ मे २०१४ ते १४ जुलै २०१४ हा कालावधी दर्शवण्यात आला. मात्र प्रत्यक्षात या काळात कंत्राटदाराला चारवेळा परवाना देण्यात आली असून प्रत्येकवेळी ०.१५ आर क्षेत्र गौण खनिज उत्खननासाठी देण्यात आले होते. इतकेच नाही तर ज्या उपस्थितांसमोर पंचनामा झाला त्यातील देवराम गोविंदा दामले यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना या अनुषंगाने माहिती देण्यात आली नव्हती. केवळ आडवी-उभी मोजणी झाल्याचे सांगत पंचनाम्यावर सही घेण्यात आल्याचे ते म्हणाले. दुसरे उपस्थित असलेले अशोक चांडक व आसाराम नागोसे यांनी सांगितल्याप्रमाणे ते मौका पंचनाम्याला उपस्थितच नव्हते. केवळ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या परिचयामुळे त्यांनी स्वाक्षरी केल्याचे त्याचे म्हणणे आहे. यामुळे खनिकर्म अधिकाऱ्यांनी केलेला पंचनामा केवळ औपचारिकता पूर्ण करत असल्याचे दिसून येते.
रेती माफियांचा अधिकाऱ्यांचे अभय
By admin | Published: July 24, 2014 11:55 PM