देवरी (गोंदिया) : येथील तहसीलदार गौरव इंगोले यांनी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर जप्तीची कारवाई केल्याने चिडलेल्या वाहनमालक पिता-पुत्राने तहसीलदारांच्या कार्यालयात घुसून धिंगाणा घातल्याचा प्रकार बुधवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास घडला. यावेळी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कामानिमित्त उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांच्या मोबाइलची तोडफोड करून आरोपी पिता-पुत्र जप्त वाहनासह पसार झाले. या प्रकरणाची तहसीलदार गौरव इंगोले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवरीचे तहसीलदार गौरव इंगोले हे तलाठी सचिन तितरे यांच्यासोबत शिलापूरकडे गौण खनिज तपासणीसाठी जात असताना डवकी फाट्याजवळ टिप्पर क्रमांक (एमएच ४०, १६१८) हा रेतीची वाहतूक करताना आढळला. या वाहनाची तपासणी केली असता, वाहनातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असल्याने तहसीलदारांनी जप्तीची कारवाई करून टिप्पर तहसील कार्यालयात जमा केला. या प्रकाराने संतप्त झालेले वाहनमालक संतोष अग्रवाल (५५) आणि कुणाल अग्रवाल (२५) (दोघेही रा. साखरीटोला) यांनी देवरी तहसीलदारांच्या कार्यालयात घुसून ‘माझा टिप्पर का पकडला’ म्हणून तहसीलदार इंगोले यांच्याशी वाद घातला. यावेळी शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये हे तहसीलदांराजवळ उपस्थित होते.
इंगोले हे उपविभागीय अधिकारी यांना प्रस्ताव देण्यासाठी तयारी करण्याच्या कामात व्यस्त होते. दरम्यान, दोन्ही आरोपींनी तहसीलदारांसोबत हुज्जत घालून तहसीलदारांकडील काही महत्त्वाची शासकीय कागदपत्रं हिसकावून घेतली. दरम्यान, तेथे उपस्थित शिक्षणाधिकारी गजभिये यांनी हा प्रकार आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. हा गोंधळ रेकॉर्ड होत असल्याचे पाहून आरोपी कुणाल व संतोष यांनी गजबे यांना शिवीगाळ करून त्यांचे मोबाइल खाली आपटून फोडला.
मोबाइल व जप्त केलेले वाहन घेऊन पसार
त्यानंतर फुटलेला मोबाइल, जप्ती वाहन व चालकासह दोन्ही पिता-पुत्र आरोपी पळाले. यावेळी तहसीलदारांच्या टेबलवरील कागदपत्रे फाडून बाहेर फेकली. या प्रकरणातील दोन्ही पिता-पुत्र फरार असून, आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. देवरी तहसीलदारांच्या तक्रारीवर पोलिसांनी भांदविच्या कलम ३५३, ३९२, १८६, ४२७, २९४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आनंद घाडगे हे करत आहेत.
तलाठ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अवैध रेती तस्करी करणाऱ्या टिप्परवर जप्तीची कारवाई होत असताना तहसील कार्यालयात घुसून धिंगाणा घालणाऱ्या संतोष अग्रवाल व कुणाल अग्रवाल यांनी शिवीगाळ करून टिप्पर पळवून नेला. त्यावेळेस सहा ते आठ तलाठी हे कार्यालयात उपस्थित होते. त्यांच्यासमोर टिप्पर पळवून नेत असताना सर्व तलाठी मूक दर्शक बनून सर्व प्रकार बघत उभे हाेते. या प्रकाराने तलाठ्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रेती माफियांची वाढली हिंमत
देवरी कार्यालयात परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले हे तहसीलदार म्हणून नियुक्त होताच त्यांनी अवैध गौण खनिज तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चिडलेल्या रेती तस्करांनी थेट तहसील कार्यालयात घुसून तोडफोड केल्याने रेती माफियांचे प्रस्थ किती वाढले आहे, हे दिसून येते.