आमगाव : तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे दिवसेंदिवस रेतीचे अवैध उत्खनन करून तेथील वृक्षांची कत्तल केली जात आहे. रेतीच्या अवैध उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तर वृक्षांची कत्तल केली जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे; मात्र या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे रेती माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी मुंडीपार येथील गावकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार येथे महसूल विभाग आमगाव, सांजा सरकारटोला हद्दीतील नदीपात्रातील रेती अवैध उपसा केली जात आहे. तसेच रस्ता ओलांडण्यासाठी वन विभागाची जागा असल्याने तेथील वृक्षांची कत्तल केली जात आहे. रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे गावातील रस्त्याचीसुद्धा दुर्दशा झाली आहे. तर दिवसरात्र रेती वाहून नेणाऱ्या ट्रकची वर्दळ सुरू असल्याने गावकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रेती घाटाचा लिलाव झाला नसतानासुद्धा मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. रेती माफियांनी रेतीचे उत्खनन करून गावालगत साठवणूक करून ठेवली आहे. जेणे करून पावसाळ्यात दुप्पट दराने विक्री करता येईल, या उद्देशाने ठेवली आहे; मात्र या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन रेती माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी लक्ष्मण उईके, सुनील कुंभरे, रामलाल वाढीवा, संतोष मडामे, पिरम मडामे, मंगेश कुरंजेकर, अशोक उईके, रामलाल वाडीवा, सहेशराम कुरांजेकर, यशवंत कुंभरे, शोभेलाल मानकर, वासुदेव मानकर, कुवरलाल कुरजेकर यांनी केली आहे.