गोंदिया : गाव विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१७-१८ चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी (दि.१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाब पाटील, राज्यमंत्री बनसोडे, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य सचिव संजय चहांदे, उपसचिव अभय महाजन आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्य़ातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश राठोड, शालेय स्वच्छता सल्लागार भागचंद्र रहांगडाले यांनी वेब कास्ट द्वारे उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे सन २००० पासून राज्यात राबविण्यात येत आहे. आजघडीला हे अभियान गावातील प्रत्येक वॉर्डपासून तर राज्यस्तरावर राबविले जात आहे. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील अवनखेड ग्रामपंचायतने पटकावला. ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवकांना नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी राज्य पातळीवर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच विशेष तीन पुरस्कार वितरण करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातही हे अभियान मोठ्या जोमाने राबविण्यात येत आहे. सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्य़ातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध तसेच देवरी तालुक्यातील भागी या ग्रामपंचायत राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र झाल्या आहेत. वेब कास्टद्वारे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्व जिल्ह्यांनी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले.