गोंदिया : रामनगर पाेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या संत नरहरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गोंदिया या पतसंस्थेतून ग्राहकांच्या ५८ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळात ५७ लाख ९१ हजार १०३ रुपयांचा अपहार केला. या प्रकरणात अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्यासह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लेखा प्रशिक्षण श्रेणी २ सहकारी संस्था गोंदिया येथील अनिरुध्द प्रभाकर जोशी (५४) यांनी या संदर्भात रामनगर पोलिसात तक्रार केली आहे.
संत नरहरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गोंदियाचे फेर लेखा परीक्षण कालावधीत सन २०१५ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत सर्व संचालकांची दर मासिक सभा झालेल्या आहेत. त्यानंतर संचालकाची मासिक सभा झालेली नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्यामार्फतीने संस्थेचा कामकाजासीसंबंधीत जे निर्णय घेतले जातात अशा सर्व निर्णयासाठी समीतीचे सर्व सदस्य संयुक्तपणे जवाबदार असतात.
तत्कालीन कार्यरत असलेले संचालक, व्यवस्थापक यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष यांनी घेतलेल्या निर्णयाला हरकत न घेता संस्थेतील लोकांच्या रोख रकमेच्या विविध ठेवीचा खोट्या नोंदी घेऊन ते खरे असल्याचे दाखवून अपहार करण्यास संमती दिली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी संस्थेत मोठ्या प्रमाणात स्वत:च्या फायद्यासाठी नियमबाह्य व्यवहार बोगस कर्ज वाटप, येणे कर्ज व्याज, दैनिक ठेव जमा झाल्याचे दर्शवून ताळेबंद पत्रकात देय रक्कम कमी दाखवून त्याबाबत खोटा अभिलेख तयार करून तो खरा असल्याचे दाखविला. संस्थेची व सर्व साधारण सभासंदाची, ठेवीदाराची संस्थेत विश्वासाने ठेवलेल्या विविध ठेवी व त्यांना देय असलेल्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली.
या प्रकरणी १४ आरोपींवर रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, ३४, सहकलम ३,४, महाराष्ट्र ठेवीदाराचे हित संबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोने करीत आहेत.