गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पडल्या. त्यानंतर १२ फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंचाची निवडणूक पार पडली. सरपंच व उपसरपंचपदी निवडून आलेल्या महिन्याकाठी मानधन दिले जाते. यात सरपंचांना ३ हजार रुपये तर उपसरपंचांना हजार रुपये मानधन दिले जाते. पण निवडून आलेल्या सदस्यांना कुठलेच मानधन मिळत नसून मासिक भत्ता व चहापान म्हणून शंभर रुपये दिले जातात. त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सरपंच आणि उपसरपंच यांना महिन्याकाठी जसे मानधन दिले जाते. तसेच मानधन सदस्यांनासुध्दा देण्यात यावे सूर आहे. तर निवडून आलेले सरपंच आणि उपसरपंचसुध्दा सदस्यांच्या मताशी अनुकूल असून ग्रामपंचायत सदस्यांनासुध्दा महिन्याकाठी किमान हजार रुपये तरी मानधन देण्यात यावे असे सांगितले. ग्रामपंचायत सदस्यसुध्दा पदाधिकाऱ्यांप्रमाणेच गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करीत असतात. अनेकदा त्यांच्या समस्यांकरिता ते तालुका स्तरावरसुध्दा जात असतात. तर कधी गावातील उपक्रमासाठी स्वत:च्या खिशातून खर्च करीत असतात. त्यामुळे या सदस्यांना सन्मान तरी शासनाने मानधन देण्याची गरज असल्याचे सांगितले.
....
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती
१८९
निवडून आलेले सदस्य
१,६९३
निवडून आलेले सरपंच
१८९
...........
चहापान मिळतात शंभर रुपये
ग्रामपंचायत सदस्यांना मानधन देण्याची तरतूद अद्यापही ग्रामविकास विभागाने केलेली नाही. त्यामुळे त्यांना मासिक मीटिंग भत्ता म्हणून चहापान शंभर रुपये दिले जातात. ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. पण ग्रामविकास विभागाने चहापान म्हणून दिल्या जाणाऱ्या रक्कमेत केवळ शंभर रुपयांनी वाढ केली असल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना केवळ मानच मिळत असून मानधन मिळत नसल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली.
.......
कोट
ग्रामविकास विकास विभागाकडे सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करून सदस्यांनासुध्दा किमान १ हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी केली होती. मात्र अद्यापही त्यावर कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. सदस्यांनासुध्दा मानधन मिळायला हवे.
प्रतिमा बोरगाव, बोंडगाव
.......
सरपंच आणि उपसरपंच यांच्याप्रमाणेच गाव विकासात ग्रामपंचायत सदस्यांची भूमिकासुध्दा महत्त्वपूर्ण असते. तेदेखील गावकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी तालुका व जिल्हा मुख्यालयी बरेचदा जात येत असतात. त्यामुळे त्यांनासुध्दा शासनाने मानधन द्यायला हवे.
-
.....
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनासुध्दा शासनाकडून मानधन दिले जाते. मग ग्रामपंचायत सदस्यांना मानधन देण्यात शासनाला काय अडचण आहे. शासनाने त्यांनासुध्दा मानधन दिल्यास त्यांचादेखील सन्मान केल्यासारखे होईल.
-