इसापूर : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील महागाव ही मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीमध्ये १३ सदस्य आहेत. येथील सरपंचाने लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून शुक्रवारी मासिक सभा घेऊन कलम १४४ चे उल्लंघन केले असून सरपंचाला पदमुक्त कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्याने केली आहे.
कोणत्याही प्रकारची जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता सरपंचाने शुक्रवारी मासिक सभा ग्रामपंचायतीच्या एकाच खोलीत घेतली. सर्व शासकीय कार्यालय ऑनलाइन मीटिंग घेतात. मात्र, ग्रामपंचायत महागावची मासिक सभा सुरू असल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या मासिक सभेत काय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावरून सध्या गावात चर्चा सुरू आहे. सरपंच प्रभाकर कोवे यांनी कलम १४४ चे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून पदमुक्त करावे, असे लेखी निवेदन ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक ऋषी झोडे यांनी उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक अर्जुनी मोरगाव यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
प्रतिक्रिया
मी नोटशिट टाकून सरपंचांना धारा १४४ बद्दल कल्पना दिली होती. या काळात मासिक सभा घेणे म्हणजे कोरोना संक्रमण वाढविणे असून याव्यतिरिक्त दुसरे काहीही साध्य होणार नाही. जिल्हाधिकारी यांची मासिक सभेसाठी पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे, याची सुद्धा कल्पना दिली होती.
- विनोद श्रीवास्तव, ग्रामविस्तार अधिकारी.
कोट
कोरोना विषाणू प्रादुर्भाव सुरू असून त्यावर काय उपाययोजना करता येतील, याविषयावर मासिक सभा घेण्याच्या संदर्भाने खंडविकास अधिकारी यांना तोंडी विचारले होते त्यांनी तोंडी परवानगी दिली होती, लेखी आदेश घेतले नव्हते आजच्या सभेत संपूर्ण १३ पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक ऋषी झोडे हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना सभेला येऊ नका, अशी सूचना त्यांना दिली होती; पण यानंतरही ते सभेला आले.
- प्रभाकर कोवे, सरपंच, महागाव