लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तालुक्यातील इटखेडा ग्रामपंचायत सरपंच आशा इंद्रदास झिलपे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून गैरकायदेशीररीत्या शासकीय जमिनीचे ग्रामपंचायत ठरावानुसार फेरफार घेऊन स्वतःच्या व पतीच्या नावाने असलेली अतिक्रमित शासकीय जागा तानाबाई शास्त्रकार या आपल्या आईच्या नावाने केली. मात्र, त्यांनी या जागेवरील अतिक्रमण सोडले नाही. यामुळे अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांनी २५ ऑक्टोबर रोजी आदेश पारित करून, आशा झिलपे यांना सरपंचपदावरून अपात्र ठरविले आहे.
इटखेडा ग्रामपंचायतच्या २०२२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच म्हणून आशा झिलपे या निवडून आल्या होत्या. इटखेडा येथील भरत लीलाधर अनवले यांनी सरपंच आशा झिलपे यांच्या पतीने शासकीय गट क्रमांक ३०८ मध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम १४ (१) (ज-३) नुसार इटखेडा ग्रामपंचायतच्या सरपंचपदावरून त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने अर्जदार, गैरअर्जदार यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे, तलाठी, ग्रामसेवक यांचा अहवाल मागविण्यात आला होता. तलाठी व राजस्व निरीक्षक यांच्या मोका चौकशी अहवालानुसार, ग्रामपंचायत कार्यालयातील दस्तऐवजांमधील गाव नमुना ८ मध्ये सरपंच आशा झिलपे यांची आई तानाबाई शास्त्रकार यांच्या नावाने ३,५०० चौरस फूट खुली जागा अतिक्रमण करून ताबा दर्शविल्यानुसार नोंद घेण्यात आली आहे. ग्रामसेवकाच्या अहवालानुसार सरपंच आशा झिलपे यांची आई तानाबाई शास्त्रकार यांच्या नावाने संबंधित व्यक्तीच्या परवानगीने व ग्रामपंचायत कमिटीच्या संमतीने फेरफार घेण्यात आले आहेत.
चौकशीत स्पष्ट झाल्याने कारवाई ग्रामपंचायत गाव नमुना ८ नुसार मालमत्ता क्रमांक २५५ ही इंद्रदास लक्ष्मण झिलपे व सरपंच आशा इंद्रदास झिलपे यांचे नावे होती. ग्रामपंचायत सभा ठराव क्रमांक ६/२ दिनांक २३/०२/२०२३ नुसार ग्रामपंचायतीने ठराव घेऊन ही मालमत्ता आशा झिलपे यांची आई तानाबाई शास्त्रकार यांच्या नावाने फेरफार घेतले आहे. सर्व प्रकरणाची शहानिशा करून सरपंच आशा झिलपे यांना सरपंचपद धारण करण्यास अपात्र ठरविण्यात आले. या संबंधीचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांनी २५ ऑक्टोबर रोजी पारित केले आहे. या प्रकरणात अर्जदार भरत अनवले यांची कायदेशीर बाजू अॅड.सी. के. बडे यांनी मांडली, तर सरपंच आशा झिलपे यांच्या वतीने कायदेशीर बाजू अॅड. बी. जी. अवचटे यांनी मांडली.