गोंदिया : भारत हा कृषिप्रधान देश असून देश व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. तसेच स्वराज्याच्या संकल्पनेत संपूर्ण स्वातंत्र्यामध्ये शेती व्यवसाय हा देशाची आधारशिला आहे. देशाच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त प्रत्येक खातेदारास तलाठ्यांमार्फत घरोघरी जाऊन मोफत सातबारा देण्याच्या उद्देशाने २ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा सभा घेऊन मोहिमेत करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक निर्देश दिले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक सातबारा अद्ययावत उताऱ्याची प्रत जिल्ह्यात संबंधित तलाठ्यामार्फत शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावर सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या आर्थिक उभारणीतील शेतकऱ्यांचे योगदान विचारात घेऊन २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येईल. या मोहिमेंतर्गत डिजिटल सातबारा सर्व संबंधितांना समजण्यासाठी अधिक सोपा करण्यात आलेला आहे. ही मोहीम राबविण्यासाठी जिल्हास्तरावर कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. त्यानुसार २ ऑक्टोबर रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा वाटप करण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी युद्धपातळीवर महसूल विभागातर्फे कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी खवले यांनी दिली आहे.