नरेश रहिलेगोंदिया : कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी जनावरांची वाहतूक करणारा ट्रक डुग्गीपार पोलिसांनी पकडला. शुक्रवारी (दि.१९) मध्यरात्री २ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ट्रक व जनावरे, असा २३.६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जनावरांना कत्तलीकरिता ट्रकमध्ये घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डुग्गीपारचे पोलिस निरीक्षक मंगेश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ५३ वरील ग्राम फुटाळा येथे शुक्रवारी (दि.१९) मध्यरात्री २ वाजेदरम्यान सापळा लावला. यामध्ये त्यांना ट्रक क्रमांक सीजी २३-बी ०२३५ दिसून आला व त्यांनी ट्रकला थांबवून त्याची पाहणी केली असता त्यात ४२ जनावरांना निदर्यतेने कोंबून ठेवल्याचे दिसून आले. यावर पोलिसांनी तीन लाख ६८ हजार रुपये किमतीची जनावरे व २० लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण २३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तसेच ट्रक चालकावर डुग्गीपार पोलिसांत प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) सहकलम ५५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक हनवते करीत आहेत.