इतरांसाठी आदर्श : जलपुनर्भरणातून विहिरीत पाण्याचा सुकाळगोंदिया : पाण्याचे महत्व समजून घेऊन पाण्याची बचत करण्याची सुरूवात स्वत:पासून करणारे लोक फार कमी आहेत. लोकमतने जलमित्र अभियान सुरू केल्यानंतर पाण्याचे महत्व समजून घेऊन पाणी बचत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. मात्र सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन पवार यांनी २२ वर्षापूर्वीच या प्रयोगाची सुरूवात केली. लोकमत जलमित्र अभियानाच्या निमित्ताने पवार यांनाही आपला हा प्रयोग जनतेसमोर मांडण्याची इच्छा झाली. या निमित्ताने लोकांनी असे प्रयोग घरोघरी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सिव्हील लाईनमधील रहिवासी असलेले पवार दाम्पत्य व्यवसायाने शिक्षक. जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असताना मोहन पवार यांनी १९८५ मध्ये आपल्या शाळेतर्फे पाणी पुनर्भरणाचे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) मॉडेल विज्ञान प्रदर्शनात सादर केले होते. ते मॉडेल राज्यस्तरापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी १९९४ मध्ये आपल्या घरातच छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे अंगणातील खड्ड्यात सोडून ते छोट्या विहिरीत झिरपेल अशी व्यवस्था त्यांनी केली. त्यामुळे आजपर्यंत त्या विहिरीचे पाणी कधी कमी पडले नाही, असे पवार सांगतात.पाणी बचतीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पवार यांनी गोंदियाच्या हड्डीटोली मार्गावरील नवीन क्रीडा संकुलासमोरच्या असलेल्या आपल्या १.२० एकर जागेला वॉल कंपाऊंड करून तिथे पुढील बांधकाम व देखरेख करण्यासाठी दोन खोल्या बांधल्या. अंगणात सिमेंटचे फ्लोरिंग केले. पण त्या दोन खोल्यावरील आणि अंगणात पडणारे सर्व पाणी त्याच आवारातील एका चौकोनी खड्ड्यात जमा होईल अशी व्यवस्था केली. त्या खड्ड्यातून ते पाणी लागूनच असलेल्या छोटेखानी विहिरीत झिरपते. त्यामुळे भविष्यात कितीही बांधकाम केले तरी त्या छोट्या विहिरीचे पाणी तुटणार नाही, असा विश्वास पवार यांना आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
२२ वर्षांपासून ते करतात पाण्याची बचत
By admin | Published: June 10, 2016 1:50 AM