गोंदिया : समाजात महिलांकडून केल्या जात असलेल्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधील महिलांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. यानुसार जवळील ग्राम कारंजा येथील जिल्हा परिषद शाळेतून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष माननीय किशोर डोंगरवार यांच्या स्वयंप्रेरणेतून व एल.यू. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनातून ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त महिला, भगिनी, शिक्षिकांचा सत्कार करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार, सोमवारी (दि. ८) ग्राम कारंजा येथील शाळेत उपस्थित राहून तेथील महिला शिक्षिका संगीता निनावे, मंदा कोसरकर, पूजा चौरसिया व वर्षा कोसरकर या भगिनींचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, शिक्षक समितीच्या शिलेदार व पदाधिकाऱ्यांना आपल्या तालुक्यातील आपल्या केंद्रातील आपल्या शाळेतील सर्व महिलांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष डोंगरवार, खोब्रागडे, एन.आर. बडवाईक, बी.एस. केसाळे, जिल्हा चिटणीस किरण बिसेन, विरेंद्र वालोदे, संगीता निनावे, वर्षा कोसलकर, पूजा चौरसिया, मंदा कोसरकर, मनोज चौरे, डी. आय. खोब्रागडे, एम. टी. जैतवार आदी उपस्थित होते.