प्रकरण अड्याळ येथील ग्रामपंचायतीचे : अधिकारी मूग गिळूनविशाल रणदिवे अड्याळ पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अड्याळ ग्रामपंचायतीचे नावलौकिक आहे. यात घडलेल्या घोटाळ्यात आरोप सिद्ध झाल्यावरही घोटाळेबाज अजूनही मोकाटच आहे. विशेष म्हणजे अधिकारीही मूग गिळून आहे. अड्याळ येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मानापुरे यांनी सदर घोटाळा उघडकीला आणला होता. शासकीय कामात अडथडा आणला म्हणून मानापुरे यांच्याविरूद्ध अटकेची कारवाई करण्यात आली होती. रक्षकच भक्षक बनल्याचा येथे दिसून आले. भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी म्हणून मानापुरे यांनी उपोष केले. त्यात संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना आदेश मिळताच तीन वेळा चौकशीही करण्यात आली. विशेष म्हणजे यात समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली. ६ डिसेंबर २०१३ ला खंड विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस विभागातर्फे ग्रामपंचायतीच्या जमाखर्चाचा लेखा परीक्षण करण्यात यावे व नंतरच गुन्हा दाखल करावा, असे सांगण्यात आले होते. रितसर लेखपरीक्षण झाल्यावर घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले. मात्र राजकीय दबावामुळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने आजही घोटाळेबाज मोकाट आहे. सदर अहवालात नालीचा गाळ उपसणे, हातपंप दुरूस्ती करणे, ब्लिचिंग पावडर व तुरटी खरेदी करणे, विद्युत साहित्य खरेदी करणे, रंगरंगोटी साहित्य खरेदी करणे आदी साहित्य सभेत ठराव न घेता उसनवारी रक्कम देणे, सरपंचांना मिटींग भत्ता देणे, मैदान सपाटीकरण करणे, जलवाहिणीचे काम करणे, मोटार दुरूस्ती करणे आदी कामे तीन लक्ष ५६ हजार २० रूपयांचे अफरातफर झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात दोषी असलेल्या पदाधिकारी व अधिकारी यांची नावेही उघड करण्यात आली होती. ज्या ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार उघडकीस आणला त्यांनाच अटक करण्यात आली. मात्र ज्यांनी गैरव्यवहार केला त्यांच्याविरूद्ध प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे व गैरव्यवहार करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दोष सिद्धीनंतरही घोटाळेबाज मोकाटच
By admin | Published: February 13, 2016 1:16 AM