आरक्षण निघालेच नाही : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कार्यवाहीअर्जुनी मोरगाव : सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत अन्याय झाल्याची अपिल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले होते. मात्र जनतेने नवीन आरक्षण सोडत अमान्य करत गदारोळ केल्याने शुक्रवारी (दि.३१) आयोजित सभा बारगळली. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जाणार असल्याचे समजते. याबाबत ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाला जणू ग्रहणच लागले आहे. सर्वप्रथम सरपंचपदाची आरक्षण सोडत २ जुलै रोजी काढण्यात आली होती. मात्र चुकीच्या नियोजनामुळे सभा तहकूब होऊन ३ जुलै रोजी ७० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. भरनोली (तुकुमनारायण), येरंडी-देव, अरततोंडी (दाभना) व बाराभाटी येथील नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांची दखल घेत ३१ जुलै रोजी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार शुक्रवारी (३१) पंचायत समितीच्या बचत भवनात दुपारी २ वाजता आरक्षण सोडतीसाठी मोठ्या संख्येने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित झाले. तहसीलदार एच.जे. रहांगडाले यांनी आरक्षण सोडतीच्या कार्यवाहीला सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित जनसमूदायाने एकच गदारोळ केला. ३ जुलै रोजी जाहीर केल्याप्रमाणेच आरक्षण कायम ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आम्हाला मान्य नाही. आरक्षण बदलवायचे असेल तर परत ग्रा.पं.च्या निवडणुका नव्याने घ्या, ज्या ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आक्षेप आहेत केवळ तेवढीच आरक्षण सोडत काढण्याची मागणी नागरिकांनी केली.२५ जुलै रोजी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. ग्रा.पं. निवडणुकीपूर्वी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या पक्षाचा सरपंच व्हावा यासाठी आरक्षित जागेवर संपूर्ण ताकद लावून उमेदवार निवडून आणला. मात्र आता सरपंचपदाचे आरक्षण बदलणार असल्याच्या वार्तेने त्यांच्यात नैराश्य आले. अनेक ठिकाणी सरपंचपदाच्या आरक्षित उमेदवारांवर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्यात आले. नवीन आरक्षण सोडतीमुळे आपले पैसे वाया जाणार या भीतीमुळे गावागावातून नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांना घेवून येथे एकच गर्दी झाली होती. पंचायत समिती बचत भवनाचा हॉल खचाखच गर्दीने भरला होता. अनेक लोकं बाहेर उभी होती. अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे उपस्थितांनी तालुका प्रशासनाविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली. तालुका प्रशासनाकडून आरक्षण सोडतीला घेऊन वारंवार चुका केल्या जात आहेत, याचा मनस्ताप प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटला नसून गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पडते की नाही यासाठी नवनिर्वाचित सदस्य आतूर झाले आहेत. प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतला तरी दावेदार न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
सरपंचपद आरक्षण सोडतीत गदारोळ
By admin | Published: August 01, 2015 2:09 AM