लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना औषधेही वितरित केली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून राज्य पातळीवरुन औषधीचा पुरवठा न केल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये विविध औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आहे.राज्य पातळीवर औषध खरेदीचे एकत्रित धोरण अद्याप निश्चित न झाल्याने त्याचा परिणाम यावर होत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त करीत औषधी खरेदीची प्रक्रिया राबवून रुग्णांना औषधी दिली जात असल्याची माहिती आहे.सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी जातात. सामान्य रुग्णालयात तर दिवसाकाठी १००० ते १५०० रुग्ण येतात. अती तातडीचे तसेच अन्य आजारांच्या रुग्णांची गर्दी वाढत असताना औषधीही तेवढ्याच प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक असते. सामान्य रुग्णालयातून मधुमेह, रक्तदाब, अर्धांगवायू, पक्षाघात, मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत येणाºया रुग्णांना महिन्याकाठी नियमित औषधी उपलब्ध करावी लागते. या रुग्णांचीही संख्या हजारोंच्या घरात आहे. सर्व रुग्णांकरिता औषधी उपबल्ध असणे आवश्यक असते. रुग्णालयाकडून औषधी साठ्यांचे योग्य नियोजन करीत पुढील तरतूदही करुन ठेवली जाते. पण पुरवठा होत नसेल तर अडचणी निर्माण होणारच, अशी परिस्थिती सध्या निर्माण होत आहे.मागील काही महिन्यांपासून राज्य शासनाकडून औषधींचा नियमित पुरवठा झालेला नाही. परिणामी काही औषधींचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून औषधीची खरेदी प्रक्रिया स्थानिक पातळीवर राबवित तसेच नियोजन करुन प्रशासनाकडून तुटवड्यावर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण जोपर्यंत राज्य पातळीवर औषधी पुरवठा योग्य प्रमाणात होणार नाही, तोपर्यंत प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.पूर्वी स्थानिक पातळीवरील खरेदीची प्रक्रिया सुटसुटीत होती. मात्र आता ही प्रक्रिया किचकट झाल्याने अडचणी निर्माण होत आहेत.रुग्ण संख्येच्या तुलनेत औषधे कमीरुग्णालयाला दैनंदिन रुग्णांसोबत विविध ठिकाणी शासकीय यंत्रणेमार्फत घेतल्या जाणाºया शिबिराकरिता औषधींचा पुरवठा करावा लागतो. त्यामुळे रुग्णांच्या तुलनेत औषधीची उपलब्धता कमी असल्याचे सांगण्यात येते. राज्य पातळीवर एकत्रित औषधी खरेदीचे धोरण अंमलात आणले जाणार आहे. पण मागील काही महिन्यांपासून ती प्रक्रिया पूर्ण न झाल्याने स्थानिक पातळीवर औषध तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
शासकीय रूग्णालयांत औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 9:39 PM
सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना औषधेही वितरित केली जाते.
ठळक मुद्देएकत्रित खरेदी धोरणास विलंब : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून औषध खरेदी