विलास चाकाटे
लोहारा : देवरी तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण व चिचगडवरुन ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ढासगड येथे सध्या पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आह़े. सध्या तुरळक स्वरुपाचा पाऊस व ढगाळ हवामान असल्याने ढासगड येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत आह़े. जिल्ह्यातील व राज्यातील विविध ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी हजेरी लावत आहेत.
आठवड्याच्या शेवटी म्हणजे वीकेंडला पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत़े रविवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांची रेलचेल असते. जुलै, ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडत असल्याने येथील निसर्ग अधिक खुलून दिसतो. येथील डोंगरदऱ्यांनी जणू काही अंगावर हिरवा शालू परिधान केला असल्याचा भास होतो. विशेषत: ढासगड येथे शंकराचे मंदिर, मोठे त्रिशुल, श्रीकृष्णाचे मंदिर, त्यात पहाडीवरुन पाण्याचा वाहणारा प्रवाह, वाघाची गुफा, लहान मुलांसाठी उद्यान त्यामुळे केवळ तालुक्यातीलच नव्हेत तर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पर्यटक येथे हजेरी लावतात.
..............
बालकांसह ज्येष्ठ नागरिकही लावतात हजेरी
निसर्गरम्य पर्यटन स्थळ असल्याने आपल्या कुटुंबीयांसोबत या ठिकाणी रोज हजारो पर्यटक भेट देतात़. ढासगड येथील धबधबा व घाटापासूनच निसर्गाचे सुंदर दृश्य पर्यटकांना आकर्षित करते. ढासगड येथील मनमोहक दृश्य व धबधब्यामुळे बालकांसह ज्येष्ठ नागरिकही या ठिकाणी रमत असल्याचे दिसून येत़े. येथील भोलेनाथाच्या मंदिरात सुद्धा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. स्थानिक आदिवासी बांधवांना मंदिराच्या आवारात नारळसह पूजा साहित्य विक्रीतून बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होत आह़े. शिवाय अनेक व्यावसायिकांकडून या ठिकाणी नाश्ताची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.
.........
हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात पर्यटकांचा गर्दी
उंचावरील भाग असल्याने या ठिकाणी पावसाचे प्रमाणही सर्वाधिक असत़े सध्या ढगाळ हवामान तसेच तुरळक पावसाच्या सरी बरसत असल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो़ हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात पर्यटकांचा या ठिकाणी येण्याचा ओघ अधिक असतो़