गोंदिया : बंदी असलेला सुगंधित गुटखा अवैधरीत्या घेऊन जात असताना पोलिसांनी, २६ लाख रुपयांचा गुटखा व ट्रक असा एकूण ४१ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. कोहमारा टी-पॉईंट येथे डुग्गीपार पोलिसांनी मंगळवारी (दि.१५) रात्री ही कारवाई केली आहे.
डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वागळे हे सहकाऱ्यांसोबत पेट्रोलींगवर असताना त्यांना ट्रक क्रमांक एमएच ४०- सीडी ८९१० मध्ये सुगंधित गुटखा नागपूरकडे नेला जात असल्याची व ट्रक कोहमारा चौकात उभा आहे, अशी माहिती मिळाली. यावर वांगळे यांनी कोहमारा चौकात जाऊन पाहणी केली असता, ट्रक त्यांना दिसला. त्यांनी ट्रक चालकाला विचारपूस केली असता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यावर वांगळे यांनी ट्रकची पाहणी केली असता, त्यांना मोठ्या प्रमाणात सुगंधीत गुटखा मिळून आला. पोलिसांनी २५ लाख ६७ हजार ५८० रुपयांचा गुटखा व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ४० लाख ६७ हजार ५८० रुपयांचा माल जप्त केला आहे.
जप्त केलेल्या गुटखाबाबत भंडारा येथे अन्न सुरक्षा सहायक आयुक्तांना कळविण्यात आले व त्यांनी संपूर्ण मालाची तपासणी केली. प्रकरणी गौरव सुदाम खंडाईत (३४) व मेहूल चंद्रकांत भद्रा (रा.नागपूर) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेला मुद्देमाल असा
पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता, त्यात १० पोत्यांमध्ये पानमसालाचे ९० ग्रामचे ३००० पाकीट, सुगंधीत तंबाखू मजा १०८ चे ३० पोत्यांमध्ये २०० ग्रामचे १२०० टीन, सुगंधित तंबाखू इगलचे २० पोत्यांमध्ये २०० ग्रामचे ८०० पाकीट, सुगंधित तंबाखू रिमझिमचे १८ पोत्यांध्ये १००० ग्रामचे ७२० पाकीट, सुगंधीत तंबाखू (मजा १०८) चे १० पोत्यांमध्ये ५०० ग्रामचे १६० टीन, सुंगधीत तंबाखू बागबानचे १० पोत्यांमध्ये ५०० ग्रामचे ३२० टिन असा एकूण २५ लाख ६७ हजार ५८० रुपयांचा माल मिळून आला.