गोंदिया : रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी गाड्यांच्या वेळेत बदल करण्यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी वर्तमानपत्र किंवा इतर माध्यमातून तसे जाहीर करण्यात येते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कसलीच पूर्वसूचना न देता गोंदिया ते कोल्हापूरदरम्यान धावणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात १ ऑक्टोबरपासून अचानकच बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या रेल्वेगाडीने नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ झाली. अनेकांना या रेल्वेगाडीने प्रवास करता आला नाही. त्यामुळे प्रवाशांनी प्रशासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
गोंदियाकरांसह शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील प्रवाशांसाठी गोंदिया ते नागपूर किंवा त्यापुढे प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेस महत्त्वाची रेल्वेगाडी ठरली आहे. गोंदिया ते नागपूर असा दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळेवर आपल्या नियोजित ठिकाणी पोहचता येत असल्याने अनेकजण या रेल्वेगाडीला पसंती देतात. या रेल्वेची गोंदिया स्थानकावरून सुटण्याची वेळ ८:१५ अशी आहे. त्यात या रेल्वेगाडीचे वेळापत्रक कोलमडले असताना उशिराने परिचलन होत असल्याचे चित्र होते. मात्र २ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेस वेळेच्या पाच मिनिटे आधीच सोडण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेकांना या रेल्वेगाडीच्या प्रवासापासून मुकावे लागले. तर काहींना धावपळ करून गाडी पकडता आली. दरम्यान, काही प्रवाशांनी गाडी सुटल्यानंतर स्थानकावर चौकशी केली असता त्यांना महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत १ ऑक्टोबरपासून बदल करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र एक्स्प्रेस दररोज ८.१५ ऐवजी ८.१० वाजता सुटणार असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले
सद्य:स्थितीत रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक कोलमडले असून नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्वच प्रवासी रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. त्यात अर्ध्याअधिक रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांसाठी महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी सोयीची ठरते. मात्र, आता महाराष्ट्र एक्स्प्रेसलाही ग्रहण लागल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून येत असून, या रेल्वेच्या परिचलनातही गेल्या काही दिवसांपासून सातत्य नाही.