सुरेश येडे
रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असून आता शाळा उघडण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र पालकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण असून ते आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला राजी नाहीत. अशात ग्राम सिरपूर येथे गावातील ७ घरांमध्ये शाळा भरविली जात असून तेथे शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. अशात गावातील १४७ विद्यार्थी यात शिक्षणाचे धडे गिरवित असून, सिरपूर येथील हा आगळावेगळा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा चांगलाच विषय बनला आहे.
जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असून, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यात आता मोजकेच क्रियाशील रुग्ण उरले आहेत. नियंत्रणात असलेली ही स्थिती बघता शासनाकडून आता शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने पालक आजही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास राजी नाही. अशात मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर मात्र तालुक्यातील ग्राम सिरपूर येथील जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी तोडगा काढला आहे. शिक्षक गावातील ७ घरांमध्ये शाळा भरवून विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. यात २० जूनपासून नियमितपणे १४७ विद्यार्थी उपस्थिती नोंदवित आहेत.
विशेष म्हणजे, गावातील मुलांचा अभ्यास बुडू नये व त्यांची सुरक्षितता बघता गावकरीही आपल्या घरांत मुलांना शिकविण्यासाठी सहकार्य करीत आहेत. याअंतर्गत, एका घरात २१ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वच विषयांचा अभ्यास करवून घेत असून आम्हालाही खूप आनंद येत असल्याचे विद्यार्थी बोलून दाखवित आहेत. खास बाब म्हणजे, या उपक्रमामुळे विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित असल्यामुळे पालकही संकोच न करता आपल्या पाल्यांना शाळेत पाठवित आहेत. सिरपूर येथील हा आगळावेगळा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला असून अन्य गावांतील नागरिकही असाच उपक्रम राबविण्याची मागणी करीत आहेत.
---------------------------
शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार कित्येक गावांमध्ये शाळा उघडण्यात आल्या आहेत. मात्र पालक कोरोनाच्या भीतीमुळे आजही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास नकार देत आहेत. तर ज्या शाळांमध्ये अभ्यास सुरू झाला आहे तेथे कोरोनापासून बचावासाठी ठोस बंदोबस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता अन्य गावांतही सिरपूरच्या धर्तीवरच घरांमध्ये शाळा भरवून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
------------------------
कोरोना नियमांचे पालन बंधनकारक
सिरपूर येथे ७ घरांमध्ये शाळा भरविली जात असून, यामुळे विद्यार्थी सुरक्षित आहेत तरीही त्यांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच, प्रत्येकाला मास्क लावूनच यायचे आहे. शिवाय शारीरिक अंतराचे पालन करून त्यांना बसविले जात असून, सॅनिटायझरचा वापर केला जात आहे.
-------------------------------
कोट
मुलांच्या सुरक्षेसाठी घरातच भरविली शाळा
वेगवेगळ्या घरांमध्ये शाळा भरविली जात असून यामागे मुलांची सुरक्षितता व सोबतच त्यांचा अभ्यास व्हावा हाच मुख्य उद्देश आहे. गावकरीही या उपक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत आहेत. तर शिक्षकांचेही यात मोठे योगदान आहे.
- अशोक मेंढे
सरपंच, ग्राम सिरपूर