लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा नगरपंचायत अस्तित्वात येऊन एक दशक पूर्ण होत असतानाच आता नगर पंचायत परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एकीकडे मूलभूत सुविधा मिळत नसून दुसरीकडे नगर प्रशासनाने न झेपणारी करवाढ केली आहे. एवढेच नाही तर नगरपंचायत परिसरात असलेल्या प्राथमिक शाळा पूर्णपणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात चालत असूनही नागरिकांवर शिक्षण करसुद्धा लावण्यात आले आहे. जवळपास चारपट करवाढीमुळे नागरिक चिंतेत पडले आहेत.
शहरवासीयांना वाढीव कराचा मोठा फटका बसला आहे. पूर्वी तीन हजार रुपये होता तो थेट १० ते १२ हजार रुपयांपर्यंत वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून नगर पंचायत क्षेत्रात राहणारे नागरिक याबाबत आक्षेप नोंदविण्याच्या तयारीत आहेत. सालेकसा नगर पंचायतने महाराष्ट्रातील सर्वांत लहान व ग्रामीण क्षेत्र आहे हे जाणून घेतले पाहिजे. मर्यादित असून आजपर्यंत आमगावखुर्द परिसरासह नगरपंचायतच्या ग्रामीण भागात नागरी सुविधा, रस्ते व वीज यांसारख्या सुविधा नाहीत.
आजही नागरिक पाणी, स्वच्छता या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तरीही स्वच्छता, पाणी व वीज कराचे दर वाढले आहे. वाढीव करात शिक्षण कराचीही भर पडली आहे. जेव्हा की, नगर पंचायत क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी ते प्राथमिक-माध्यमिक शाळा अद्यापही नगर पंचायतच्या अखत्यारीत नसून, त्यांची देखभाल जिल्हा परिषद स्वतः करीत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची दुरवस्था झाली आहे.
अशात नगर पंचायत अस्तित्वात येऊन जवळपास एक दशक झाले तरी नगर पंचायतने या शाळांच्या विकास व मूलभूत सुविधांबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. नगर पंचायत क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा निधी खर्च केला नाही उलट आता शाळांच्या देखभालीसाठी कराची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.
नागरिकांच्या अडचणीत भरनगर पंचायत प्रशासन अग्निशमन कराचीही मागणी करीत आहे. मात्र ज्यांना अग्निशमनची गरज आहे त्यांच्याकडून कर वसूल करावा, अशी ओरड नागरिकांकडून होत आहे. वीज, गॅस, पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत वाढीव करामुळे सालेकसा नगरपं- चायत क्षेत्रातील नागरिकांच्या अडचणीत निश्चितच वाढ झाली आहे.