लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचा मागील महिन्याभरापासून पुरवठा झाला नसल्याने अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील निम्यापेक्षा अधिक शाळांत शालेय पोषण आहार तयार करणे बंद असल्याची माहिती आहे.विद्यार्थ्यांचे उत्तम पोषण व्हावे, प्राथमिक शाळेत पटनोंदणी वाढावी, विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती वाढावी, विद्यार्थ्यांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहावे, स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव नष्ट व्हावा व शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी महाराष्टÑ शासनाने ही योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना ठराविक पद्धतीने आहार दिले जाते.गेल्या महिनाभरापासून शाळांना तांदळाचा पुरवठाच झाला नाही. शिल्लक असलेल्या तांदळाचा तसेच काही शाळांनी उसनवारी करुन आहार सुरु ठेवला मात्र आजघडीला निम्यापेक्षाही अधिक शाळातील तांदूळ संपलेला आहे. काही शाळांमध्ये साठा शिल्लक आहे. मात्र नेमकी हीच परिस्थिती राहिल्यास येत्या १५ दिवसात १०० टक्के शाळांमधील आहार बंद होण्याची शक्यता आहे. काही शाळांमध्ये तेल, तिखट, मिठ व कडधान्य सुद्धा नसल्याचे समजते. हा पुरवठा दिवाळीनंतर झालाच नसल्याचे काही मुख्याध्यापकांनी सांगितले. याप्रकारामुळे विविध शाळांतील विद्यार्थी महिनाभरापुर्वीपासून आहारापासून वंचित आहेत.पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून यासंदर्भात वारंवार पाठपुरावा सुरु आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्षच दिले जात नसल्याचे चित्र आहे. या साहित्याचा पुरवठा महाराष्टÑ स्टेट फेडरेशन मार्फत केला जातो. मात्र पुरवठाच होत नसल्याने सर्वत्र ओरड सुरु आहे. कमी अधिक प्रमाणात जिल्हाभरात अशीच परिस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरतुदीने खरेदीची अडचणतेल, तिखट, मिठ व कडधान्य आदि वस्तू आपल्या स्तरावर खरेदी करण्याची सवलत आहे. त्याचे बिल अदा केल्यानंतर राशी देण्याची तरतूद आहे. मात्र तांदूळ विकत घेऊन विद्यार्थ्यांचा आहार सुरळीत ठेवण्याची मुभा नाही. या अटीमुळे शाळा व्यवस्थापन समित्या व मुख्याध्यापकांची अडचण होत आहे. शाळांतील आहार बंद असल्याने ग्रामीण भागात ओरड सुरु आहे.पुरवठादाराला आदेशयासंदर्भात शालेय पोषण आहाराचे अधीक्षक एम.बी.लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एफ.सी.आय.मध्ये तांदळाचा साठा शिल्लक नाही. परवानगी अद्याप आलेली नाही. मात्र तांदळाचा पुरवठा करण्याचे पुरवठादाराला आदेश दिले आहे. सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अडचणी उद्भवत आहेत. इतर तालुक्यात स्थिती बरी आहे. केवळ तांदळाचा साठा नाही. इतर साहित्य मात्र सुरळीत आहेत. येत्या आठवडाभरात पुरवठा होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.
शालेय पोषण आहाराचा तांदूळ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:41 AM
शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचा मागील महिन्याभरापासून पुरवठा झाला नसल्याने अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील निम्यापेक्षा अधिक शाळांत शालेय पोषण आहार तयार करणे बंद असल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देनिम्याहून अधिक शाळांमध्ये आहार बंद : विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित