लोकसहभागातून वर्गणी : जिल्ह्यातील पहिलीच डिजीटल शाळा गोंदिया : शिक्षणाची जुनी पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याची संकल्पना पुढे मांडत पलखेड्याच्या जिल्हा परिषद शाळेने लोक वर्गणीतून ७५ हजार रुपये गोळा करुन या डिजीटल संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. या डिजीटल शाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण मेळावे यासाठी शाळेतील युवराज माने व के.आर.भोयर या शिक्षकांनी शाळेतील ३० विद्यार्थ्यांसाठी डिजीटल संकल्पना अस्तित्वात आणली. गोरगरिबांकडून ७५ हजार रु. गोळा करून मुलांना विकासाच्या मार्गावर नेण्याचा चंग बांधला. गावातील लोकांनी आपल्या ऐपतीनुसार ५० रुपयांपासून हजार रुपयापर्यंत वर्गणी दिली. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी या संकल्पनेसाठी स्वत:च्या खिशातून तीन हजार रुपये दिले. शिक्षणाबरोबरच विविध रोजगार मिळविण्यासाठी हे डिजीटल शिक्षण महत्वाचे ठरेल, या हेतूने डिजीटल संकल्पना राबविण्यात आली. उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सूर्यवंशी म्हणाले, लोकांच्या खिशातून एक रुपया काढणे कठीण आहे. मात्र लोकांची मने जिंकून डिजीटल शाळेसाठी एवढी मोठी रक्कम जमविणे हे त्या शिक्षकांचे यश आहे. लोकांची मने जिंकल्यामुळे ते तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती दिलीप चौधरी होते. दिप प्रज्वलन जि.प.सदस्य ज्योती वालदे यांच्या हस्ते पं.स. उपसभापती सुरेंद्र बिसेन, खंविअ. दिनेश हरिणखेडे, तहसीलदार बांबोर्डे, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण हेगडे, माजी सभापती किशोर गौतम, पं.स.सदस्य ललिता बहेकार, अलका कोठेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पलखेड्याची शाळा झाली डिजीटल
By admin | Published: October 05, 2015 2:01 AM