परसवाडा (गोंदिया) : शेतातील मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील बघोली येथे घडली. मधुकर राजाराम तुरकर (४५) असे विद्युत धक्का लागून मृत्यू झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार मधुकर तुरकर यांची बघोली येथे शेती आहे. घरापासून शेतीचे अंतर जवळच आहे. रविवारी सकाळी ते शेतातील पिकांना पाणी करण्यासाठी म्हणून शेतावर गेले. दरम्यान त्यांना शेतातील मोटारपंप सुरू करताना करताना विद्युत धक्का लागला. त्यामुळे ते तिथेच पडले. त्यांच्याकडे काम करणारा मजूर शेतावर गेला असता मोटार पंपाजवळ तुरकर हे बेशुद्ध अवस्थेत पडले असल्याचे आढळले. त्याने लगेच तुरकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर घरच्या लोकांनी आणि शेजाऱ्यांनी तुरकर यांच्या शेताकडे धाव घेतली. तुरकर यांना तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन तुरकर यांना मृत घोषीत केले. मधुकर तुरकर हे तिरोडा तालुक्यातील बिहिरीया येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, चार भाऊ बहिण असा आप्त परिवार आहे. तुरकर यांच्या मृत्यूची वार्ता गावात पसरताच शोककळा पसरली होती.
विजेच्या धक्क्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 2:53 PM