गोंदिया : शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जणू आनंदाची पर्वणीच असते. नवीन गणवेश, नवीन पुस्तके, नवीन वर्गमित्र या सर्वांचे कुतूहल त्यांच्यात असते, तर चिमुकल्यांना शाळेत जाण्याची भीती वाटत असते. अशात त्यांना आई-बाबांचे बोट सोडवेना, तर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशव्दाराची आकर्षक सजावट असेच चित्र दरवर्षी शाळेच्या पहिल्याचदिवशी पाहायला मिळते. मात्र यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (दि.२८) सुरुवात झाली. शाळा सुरू, पण त्या विद्यार्थ्यांविनाच, त्यामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाविना गेल्याचे हे प्रथमच घडले.
कोरोनाच्या संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. कोरोना संसर्ग आटोक्यात असला, तरी अद्यापही धोका टळलेला नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने नवीन शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात केली. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शाळेत न बोलाविता ऑनलाईनच अभ्यासक्रम घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाला केल्या. त्यामुळे सोमवारपासून शाळेची पहिला घंटा वाजली, शिक्षकसुध्दा शाळेत पोहचले; मात्र विद्यार्थ्यांविनाच त्यांना शाळेचा पहिला दिवस साजरा करावा लागला. कोरोनाने अनेक गोष्टी बदलल्या. बऱ्याच गोष्टी या पहिल्यांदाच घडल्या. त्यात शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांविनाच साजरा करण्याची बाबसुध्दा प्रथमच घडली. तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरू होणार, आपणदेखील शाळेत जाणार, आपल्या जुन्या मित्रांना भेटणार, नवीन शिक्षक, नवीन वर्ग या सर्व गोष्टींची कल्पना विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र कोरोनाने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०३९, विनाअनुदानित ३४५ आणि अनुदानित २४५ अशा एकूण १६६३ शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा शाळेसह काही शाळांमध्ये ऑनलाईन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याला विद्यार्थ्यांचासुध्दा ऑनलाईन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षकांनीसुध्दा विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
...........
विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही, तर शाळा चकाचक
कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात येतील याची शाश्वती नाही. त्यातच शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांविना जाणार असल्याचे माहिती असूनदेखील जि. प. शिक्षण विभागाने सर्वच शाळा चकाचक करून ठेवल्या होत्या. शाळेची रंगरगोटी,
विद्यार्थ्यांचे स्वागत नक्षीदार काम तसेच वर्गखोल्या आणि डेस्क बेंचसुध्दा स्वच्छ करून ठेवले होते.
....................
गृहभेटीने पहिल्या दिवसाची सुरुवात
गोंदिया जि. प. शिक्षण विभागाने शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तसेच ऑनलाईनचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी ‘चला करुया अभ्यास’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात शाळेच्या पहिल्याचदिवशी झाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जात व गावातील चावडीवर विद्यार्थ्यांना एकत्र करून नवीन शैक्षणिक सत्राच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साह निर्माण झाला होता.
.................
शालेय व्यवस्थापन समित्यांची सभा
शाळा ऑनलाईन असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी ‘चला करुया अभ्यास’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणार आहेत. या उपक्रमाला पालकांचे सहकार्य मिळावे, यासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांची प्रत्येक गावात सोमवारी सभा घेण्यात आली.
...............
शाळा बंद, तरी पाठ्यपुस्तके मिळणार घरपोच
कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत केव्हा येणार, हे सांगता येत नाही. मात्र विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकाचे वाटप त्यांना घरपोच केले जाणार आहे.