कालीमाटी : धामनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा बंद पाडण्याचा इशारा पालकांनी खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.आमगाव पंचायत समिती अंतर्गत जि.प. शाळा धामनगाव येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या ५३ असून दोन शिक्षक आहेत. त्यातही एक मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळतात. हे मुख्याध्यापक शालेय पोषण आहार व इतर कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी आमगाव वारीवर असतात. सध्या एका सहायक शिक्षकामागे चार वर्गातील ५३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आली आहे. चार वर्गांना एक शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे अध्ययन वाऱ्यावरच सोडण्यासारखे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना खासगी शाळेत पाठविण्याचे ठरविले आहे.या विषयाला अनुसरून २२ सप्टेंबर २०१५ रोजी पंचायत समितीमध्ये सभापती, खंडविकास अधिकारी यांना शिक्षकांच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी शिक्षक देण्याची हमीसुद्धा देण्यात आली होती. परंतु महिना लोटूनही अद्याप शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. गावची शाळा आमची शाळा या उपक्रमाचा विसर न पडता गावच्या पाल्यांना जि.प. प्राथमिक शिक्षणासाठी पाठविण्यात आले. ज्या पालकांनी तालुक्यातील खासगी शाळेत पाठविले, त्यांची समजूत घालून गावच्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. शासनाकडून सर्व मुलांना समान शिक्षण व मोफत शिक्षण असे अभियान राबविले जाते. पण शिक्षक कमी व विद्यार्थी जास्त असल्यामुळे गावातील मुलामुलींना पूर्ण शिक्षण मिळणे कठिण झाले आहे. १२ आॅक्टोबर २०१५ पर्यंत शिक्षकांची पूर्तता न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय संतोष पारधी, रामेश्वर सोनवणे, विलास मेश्राम, महेंद्र पटले, छत्रपाल शेंडे, टोपेश बिसेन, कमलेश बागडे, भाऊराव राऊत, जगदीश शेंडे, अबिरसिंह चव्हाण, रमेश रहांगडाले, फंदुलाल टेंभरे, नलेश्वर येडे व इतर पालकांनी दिले आहे. (प्रतिनिधी)
शाळा बंद पाडण्याचा इशारा
By admin | Published: October 09, 2015 2:14 AM