आज दफ्तरविरहित दिवस : गोंदियाच्या उपक्रमाची राज्याने घेतली दखलहितेश रहांगडाले वडेगावडिजीटल शाळा, प्रेरणा दिन आणि आता दप्तरविरहित दिन अशा विविध उपक्रमांनी संपूर्ण महाराष्ट्रात गोंदियाचे नाव उपक्रमशील शैक्षणिक गोंदिया म्हणून नावारूपास आले आहे. गुरूवारी जिल्ह्यातील सरकारी, खासगी अनुदानित आणि विना अनुदानित अशा सर्वच शाळांमध्ये दफ्तरविरहित दिन पाळला जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पुस्तके शाळेकडूनच पुरविली जाणार असून ती पुस्तके शाळेतच वाचून ‘वाचन-आनंद’ अनुभवायचा आहे.गोंदियातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू केलेल्या ‘वाचन कट्ट्या’तून या दफ्तरविरहित दिनाची कल्पना पुढे आली. महाराष्ट्र शासनाने त्याची देखल घेत पायलट प्रोजेक्ट म्हणून गोंदिया जिल्ह्याची त्यासाठी निवड केली. राज्याचे प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार हे शिष्टमंडळासह गुरूवारी गोंदिया जिल्ह्याला भेट देणार असून येथील वाचन-आनंद दिवस या पायलट प्रोजेक्टची पाहणी करणार आहेत.महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील मागास, नक्षलग्रस्त व संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यास येथील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) या त्रिमूर्तीच्या प्रेरणेने उपक्रमशील व शैक्षणिक वातावरण तयार झाले आहे. या उपक्रमांना शैक्षणिक चळवळीचे रुप मिळाले असून शिक्षकही तत्परतेने पुढाकार घेत आहेत. १ हजार ४८, शाळांपैकी १४८ शाळा डिजीटल, ३६५ शाळा मोबाईल डिजीटल, ६७ शाळा कृती आधारित शिक्षण, १ शाळा आयएसओ मानांकित तर १३१ शाळांमध्ये वाचनकट्टे तयार झाले आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राकडे गोंदियाची यशस्वी वाटचाल सुरु असून गोंदिया लवकरच शैक्षणिक दिवाळी साजरी करेल, असा विश्वास शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड यांनी व्यक्त केला आहे.पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ विद्यालय स्पर्धेत जिल्ह्यातील सर्वाधिक शाळांनी सहभाग नोंदवून राज्यात प्रथम स्थान कायम ठेवले आहे. शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी ‘प्रेरणा दिना’मार्फत विद्यार्थी स्पर्धेत उतरविण्यासाठी सक्षम केले जात आहेत. तर दफ्तरविरहित दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना मोकळ्या वातावरणात वावरण्याची संधी दिली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी हा एक एक पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे.
जिल्ह्यातील शाळा अनुभवणार ‘वाचन-आनंद’
By admin | Published: September 08, 2016 12:27 AM