गोंदिया : जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथी वर्गापर्यंतच्या शाळेत पाचवीचा वर्गही सुरू केला जाणार आहे. त्यामुळे चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पण पाचव्या वर्गाकरिता दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे त्याच शाळेत पाचव्या वर्गात प्रवेश घेता येणार आहे. पण त्याकरीता सबंधित शाळेत वर्गखोली तसेच विद्यार्थ्यांची पटसंख्या ३० अनिवार्य राहणार आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांना पाचवीचा वर्ग त्याच शाळेत सुरू करताना ३० विद्यार्थ्यांची पटसंख्या तसेच स्वतंत्र वर्गखोलीसह विशिष्ट रकमेचे चलन भरावे लागणार आहे.
पहिली ते चौथीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळांना पाचवीचा वर्ग सुरू करायला परवानगी मिळाल्याने विद्यार्थ्यांना त्याच शाळेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्याकरिता शिक्षण संचालकांची परवानगी घ्यावीच लागेल. पण पालकांना त्यांच्या पाल्यांना चौथीनंतर पाचवीच्या वर्गात दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल त्याला दाखला देण्याची प्रक्रिया (टीसी देण्याची) रोखता येणार नाही. याबाबत शासनाचा निर्णय १९ सप्टेंबर २०१९ मध्येच आला होता. पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, आता या शासन निर्णयाने चौथी पर्यंत वर्ग चालविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळांचा पाचवीत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन पॅटर्नमध्ये काय?
प्राथमिक शाळा : पहिली ते पाचव्या वर्गापर्यंत
उच्च प्राथमिक शाळा : सहावी ते आठव्या वर्गापर्यंत
माध्यमिक शाळा : नववी ते दहाव्या वर्गापर्यंत
उच्च माध्यमिक शाळा : अकरावी ते बाराव्या वर्गापर्यंत
---
जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात १०३९ शाळा चालविल्या जातात. यात पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग चालविले जातात. यातील पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गात ५४ हजार २३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग चालविणाऱ्या शाळेत ७४ हजार ४९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिवाय जिल्ह्यात पहिली ते चौथीपर्यतचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळाही आहेत.
---
‘२०१९ च्या आरटीई कायद्यानुसार जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत पाचव्या वर्गाचाही समावेश करावा. यासाठी परिपत्रक काढून त्यावर अंमलबजावणी केली जात आहे.
राजकुमार हिवारे, जि.प. शिक्षणाधिकारी