गोंदिया : प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८ वीच्या शाळा सुरू होत असून शिक्षणमंत्र्यांनी याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद व खासगी शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे शासनाचे पत्र शिक्षण विभागाला आले नाही. परंतु शाळा सुरू करण्याचे पत्र ऐनवेळेवर आले तर शाळांचे निर्जंतुकीकरण कसे होणार यासाठी आतापासूनच शिक्षण विभागाने शाळांना निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना मौखिक सूचना देण्यात आल्या आहेत. वर्ग ९ ते १२ वीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. या शाळा सुरू झाल्या असून त्याला जवळजवळ २ महिन्यांचा कालावधी होत असताना आतापर्यंत फक्त ३७ टक्केच विद्यार्थी शाळेत हजर झाले आहेत. तर ६३ टक्के विद्यार्थी शाळेत पोहोचलेच नाहीत. २ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या शाळेतच विद्यार्थी गेले नाहीत. त्यामुळे आता कोरोनाची धास्ती असताना आपल्या लहान मुलांना शाळेत पाठवायचे किंवा नाही याची चिंता पालकांना सतावत आहे.
बॉक्स
९ वी ते १२ वीचे ३७ टक्केच विद्यार्थी उपस्थित
२३ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या नववी ते बारावीपर्यंतच्या ७३ हजार ११ विद्यार्थ्यांपैकी फक्त २५ हजार ५०३ विद्यार्थी शाळेत हजर झाले आहेत. म्हणजेच, फक्त ३७ टक्केच विद्यार्थी शाळेत हजर झाले आहेत. ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे हमीपत्र लिहून दिले अशा १८६२ पालकांची मुले शाळेत हजर झाली नाहीत. त्यांच्यातील धास्ती आजही गेली नाही.
बॉक्स
कोरोनाची धास्ती राहणे साहजिकच आहे. कोरोनावरील लस आली पण ती लस कोरोना योद्ध्यांना दिली जात आहे. सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध हाेईपर्यंत मुलांना शाळेत पाठविणे योग्य होणार नाही.
- अर्चना चिंचाळकर, पालक, आमगाव
...............
शासन नियोजन न करता सरळ शाळा सुरू करण्याच्या सूचना देते. तर आपल्या पाल्यांची जबाबदारी स्वीकारा म्हणून पालकांकडून हमीपत्र लिहून घेते. आमच्या मुलांची जबाबदारी आमचीच आहे. पण शासनाने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्याशिवाय शाळा सुरू करणे चुकीचे आहे.
- ममता पाऊलझगडे, पालक, किडंगीपार
...................
शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचे होत असले तरी जीवापुढे हे नुकसान सहन करणे परवडते. कोरोनामुळे अख्खे जग थांबले. आता कोरोना परतीच्या मार्गावर असताना शाळा सुरू करण्याची घाई करू नये.
- काैशल साठवने, पालक, बेदाडी-आमगाव
.........
जिल्ह्यातील विद्यार्थीसंख्या
पाचवी-१९७०४
सहावी-१९४४०
सातवी-१९६५०
आठवी-२०६०१
जिल्ह्यातील शाळा-१६६४
जिल्ह्यातील शिक्षकसंख्या- ९९२९
कोट
इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या प्राप्त दिशानिर्देशानुसार कार्य करण्यात येईल. आजघडीला शिक्षकांची आरटी-पीसीआर तपासणी करणे तसेच शाळा निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात नियोजन जिल्हास्तरावरून करण्यात आले आहे. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षकांची कोरोना चाचणी होणार आहे. पोषक वातावरणात शाळा सुरू करण्याची कार्यवाही करू
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गोंदिया