अर्जुनी-मोरगाव : जिल्ह्याने तंबाखूमुक्त शाळा अभियानात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील १,६५३ शाळांपैकी १,५८५ शाळांनी तंबाखूमुक्त शाळाचे निकष पूर्ण केल्याने त्यांना तंबाखूमुक्त शाळा घोषित केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व आरोग्य विभागाने तंबाखूमुक्त शाळांचे सुधारित नऊ निकष पारित केले असून, जिल्ह्यातील उर्वरित ९२ शाळांनी तंबाखूमुक्त शाळेचे निकष पूर्ण केले नव्हते. आता या शाळांचे निकष पूर्ण करण्याकरिता नियोजन करण्यात आले असून, या शाळांची तंबाखूमुक्तीच्या दिनेश वाटचाल सुरू असल्याचे गटशिक्षणाधिकारी आर. एल. मांढरे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन व आरोग्य प्रबोधिनी संस्था यांच्या संयुक्तवतीने येथील गटसाधन केंद्रात तंबाखूमुक्त शाळा अभियानाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी. बी. पारधी, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे, सलाम मुंबईचे समन्वयक संदेश देवरुखकर,आरोग्य प्रबोधिनीचे डॉक्टर सूर्यप्रकाश गभने, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ए. एस. बरईकर, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल चव्हाण, जिल्हा बालरक्षक कुलदीपिका बोरकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक दिलीप बघेले उपस्थित होते. कार्यशाळेत देवरुखकर यांनी, नवीन निकषांची ओळख, मांडणी, ॲपवर अपलोड करण्याच्या पद्धती यावर सविस्तर सादरीकरण केले. डॉ. गभने यांनी, अपलोड करताना येणाऱ्या अडचणींची चर्चा व त्यावरील उपाय योजनांची मांडणी केली. आरती पुराम यांनी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. संचालन व नियोजन सत्यवान शहारे यांनी केले. प्रास्ताविक विजय काशीवार यांनी मांडले. आभार भास्कर लेंडे यांनी मानले. कार्यशाळेला तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.