लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, शालेय शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच या विद्यार्थ्यांचे नववीतील गुण आणि वर्षभरातील कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या मूल्यांकनावरून निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळांना परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून ४ जुलैपर्यंत त्याचा अहवाल शिक्षण मंडळाकडे सादर करायचा होता. यासाठी बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नेमके कसे करायचे, यासाठी एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले होते. मात्र बऱ्याच शाळांनी या परिपत्रकाचे नीट वाचन केले नाही. त्यातील मुद्दे समजून घेतले नाहीत. तसेच ८० गुणांचे मूल्यांकन करायचे असते, त्यांनी १०० गुणांचे मूल्यांकन करून बोर्डाकडे निकाल सादर केला. त्यामुळे बोर्डाने यात त्रुटी काढल्याने जिल्ह्यातील ९७ शाळांना पुन्हा मूल्यांकन करून ते सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल नियोजित वेळी न लागता, त्याला पुन्हा विलंब होण्याची शक्यता आहे.
मुख्याध्यापक म्हणतात...
आमच्या शाळेतील शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना बोर्डाने दिलेल्या परिपत्रकाचे सविस्तर वाचन करून निकाल तयार केला. तो बाेर्डाकडे सादर सुध्दा केला असून, त्यात बोर्डाने कुठल्याही त्रुटी काढल्या नाहीत. परिपत्रकानुसार निकाल सादर केला आहे.
- नरेंद्र काडगाये, मुख्याध्यापक
दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शाळांनी कसे करावे यासाठी बोर्डाने एक परिपत्रक तयार करून पाठविले होते. हे परिपत्रक सर्व शिक्षकांना नीट समाजावून सांगितले. निकाल तयार करताना काही त्रुटी आल्यास त्यांचे वेळीच संबंधित व्यक्तीशी बोलून निरसन केले. त्यामुळे आमच्या शाळेच्या निकालात कुठल्याच त्रुटी आलेल्या नाही.
- अनिल मंत्री, मुख्याध्यापक
९७ शाळांना कळलेच नाही मूल्यांकन
जिल्ह्यात दहावीच्या एकूण १०३९ शाळा आहेत. या सर्वच शाळांनी निकाल तयार करून तो बोर्डाकडे सादर केला. पण ९७ शाळांच्या निकालात बोर्डाने त्रुटी काढल्या असून त्यांना त्या त्रुटी दूर करून निकाल पुन्हा सादर करण्यास सांगितले. त्यामुळे दहावीचा निकाल थोडा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
मूल्यांकनातील त्रुटी
- दहावीचा निकाल तयार करताना ८० गुणांच्या आधारावर तो तयार करायचा होता. पण काहींनी तो १०० गुणांच्या आधारावर तयार केला.
- निकाल कसा तयार करायचा याच्या परिपत्रकाचे काही शाळेच्या शिक्षकांनी परिपूर्ण वाचन केले नाही, त्यामुळे त्यात त्रुटी आल्या.
- शिक्षण विभागाने निकाल कसा तयार करायचा यासाठी ऑनलाईन कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या.
- निकाल तयार करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच मूल्यांकन योग्य न झाल्याने बोर्डाने त्यात त्रुटी काढल्या आहेत.
बोर्डाने दहावीचा निकाल तयार करून तो कसा सादर करायचा, यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यानुसार सर्वच शाळांनी निकाल तयार करून ताे बोर्डाकडे सादर केला आहे.
- प्रफुल्ल कछवे, शिक्षणाधिकारी.