अनेक वर्षांपासून भाडे प्रलंबित : न.प.च्या वसुली पथकाची कारवाईगोंदिया : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या नेतृत्वात वसुली अधिकाऱ्यांच्या एका दलाने भाडे न देणाऱ्या दोन दुकांना सिल ठोकले. ही कारवाई गुरूवार, ९ मार्च रोजी दुपारी रामनगर परिसरातील नगर परिषदेच्या व्यापार संकुलात करण्यात आली. अहसान अब्दुल हिपाजुउल सिद्दिकी याच्यावर नगर परिषद व्यापार संकुलात आपल्या दुकानांसाठी भाड्याच्या खोल्यांची रक्कम ३३ हजार १२२ रूपये बाकी होती. सन २०१२-१३ पासून त्याने भाडे दिले नव्हते. याशिवाय सेवा कराचे सात हजार ७५५ रूपये व २४ टक्के व्याज नऊ हजार ८१० रूपये असे एकूण ५० हजार ६५७ रूपये होत होते. याचप्रकारे सैयद जाकीर अली वारसअली याच्यावर ९२ हजार ४७२ रूपयांचे भाडे आहे. सात हजार ७५५ रूपये सेवा कर व २४ हजार ०५४ रूपये व्याज, असे एकूण एक लाख २४ हजार २८१ रूपयांची वसुली बाकी होती. या रकमेच्या वसुलीसाठी महाराष्ट्र नगर परिषद औद्योगिक अधिनियम १९६५ च्या कलमान्वये त्यांना बिल देण्यात आले. याच आधाराची कलम १५१ अन्वये नोटीस देण्यात आले व कलम १५२ अन्वये २ मार्च रोजी जप्ती वारंट काढण्यात आला. यानंतरही दोन्ही भाडेकरूंनी कसलेही लक्ष दिले नाही. त्यामुळे गुरूवार, ९ मार्चला दुपारी दोन्ही दुकानांना सिल ठोकण्यात आले. ही कारवाई नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे, बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा, कर निरीक्षक एस.डब्ल्यू. शेंडे आरोग्य निरीक्षक गणेश हथकैया, अग्निशमन अधिकारी प्रकाश कापसे, लायसेंस निरीक्षक प्रदीप घोडेस्वार व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून केली. सदर दोन्ही दुकानदारांवर भाड्याच्या सदर रकमेशिवाय टॅक्ससुद्धा बाकी आहे.(प्रतिनिधी)
दोन दुकानांना ठोकले सील
By admin | Published: March 10, 2017 12:35 AM