लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मालमत्ता कर वसुलीला घेऊन कुणालाही न जुमानता सुरू असलेल्या कारवायांतर्गत कर वसुली पथकाने शुक्रवारी (दि.२५) शहरातील माजी नगरसेवक बटर पठाण यांच्या सुभाष बागेतील कॅंटीनला सील केले. त्यांच्यावर सन १९९७ पासून ३ लाख ३८ हजार रूपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. तर बाजार परिसरातील जैन फर्निचर संचालक यांनी लेखी स्वरूपात मालमत्ता कर भरण्याची हमी दिल्याने त्यांना २ दिवसांची मुदत देण्यात आली अन्यथा तेथेही सील ठोकण्याची पथकाने तयारी केली होती. शहरातील मालमत्ता कर वसुलीसाठी जाणाऱ्या पथकाने पूर्वी काही नगरसेवकांसह अन्य नेत्यांची फोन येत होते. परिणामी मालमत्ता कर वसुलीत अडथळा येत होता व यामुळेच मालमत्ता कराची थकबाकी व मागणी आजघडीला ११ कोटींच्या घरात गेली आहे. मात्र हा प्रकार मुख्याधिकारी करण चव्हाण यांना पचनी पडला नाही व त्यांनी कुणालाही न जुमानता मालमत्ता कर वसुली करण्याचे अन्यथा संबंधितांची मालमत्ता सील करण्याचे अधिकारच पथकाला देऊन टाकले आहे. मुख्याधिकाऱ्यांचाच पाठिंबा असल्यामुळे पथकही जोमात कामाला लागले असून आतापर्यंत शासकीय व खाजगी मालमत्तांनाही सील ठोकण्याचे सत्र शहरात सुरू आहे. यातूनच पथकाने शुक्रवारी (दि.२५) शहरातील माजी नगरसेवक पठाण यांच्या सुभाष बागेतील कॉफी हाऊस या कॅंटीनवर धडक दिली. त्यांच्यावर ३ लाख ३८ हजार रूपयांची थकबाकी असून थकबाकी न भरल्यामुळे पथकाने कॅंटीनला सील केले. त्यानंतर पथकाने बाजारातील जैन फर्निचरचे संचालक राजेश जैन यांच्याकडे धडक दिली. त्यांच्यावर पाच लाख २० हजार रूपयांची थकबाकी असल्याने पथक सीलींगच्या तयारीतच होते. मात्र जैन यांनी कराचा भरणा करण्याची तयारी दर्शवून हमी पत्र दिल्याने कारवाई टळली. वसुली टाळण्यासाठी नेत्यांचे फोन सुरू मागील कित्येक वर्षांपासून शहरातील मोठे थकबाकीदार कर वसुली टाळण्यासाठी नेत्यांची मदत घेत आले आहेत. नेते मंडळी अधिकाऱ्यांना फोन करीत असल्याने वसुली टळत गेली व आज तीच चूक नगर परिषदेच्या अंगलट येत आहे. मात्र मुख्याधिकारी चव्हाण यांच्यावर फंडा काम करीत नसून त्यांनी जो नेता फोन करणार त्याच्यावर अगोदर कारवाई करा असा पवित्राच घेतला आहे. त्यानुसार पथक आता नेत्यांच्या फोनची वाट बघत असून जो फोन करेल त्याच्यावर अगोदर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
माजी नगरसेवकाच्या कँटीनला केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 5:00 AM
शहरातील मालमत्ता कर वसुलीसाठी जाणाऱ्या पथकाने पूर्वी काही नगरसेवकांसह अन्य नेत्यांची फोन येत होते. परिणामी मालमत्ता कर वसुलीत अडथळा येत होता व यामुळेच मालमत्ता कराची थकबाकी व मागणी आजघडीला ११ कोटींच्या घरात गेली आहे. मात्र हा प्रकार मुख्याधिकारी करण चव्हाण यांना पचनी पडला नाही व त्यांनी कुणालाही न जुमानता मालमत्ता कर वसुली करण्याचे अन्यथा संबंधितांची मालमत्ता सील करण्याचे अधिकारच पथकाला देऊन टाकले आहे.
ठळक मुद्दे३.८८ लाखांची थकबाकी : सुटीच्या दिवशीही धडाका सुरूच