गोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या माता-पित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने ऑपरेशन मुस्कान अभियान राबविण्यात आले. गोंदिया जिल्हा पोलिसांनी १० व्या ऑपरेशन मुस्कानमध्ये सात बालकांचा शोध घेऊन या बालकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
मुलांच्या हातून भीक मागण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून भीक मागितली जाते. काहींना वाम मार्गाकडे वळविले जाते. १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्य शासन या बालकांना शाेधून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबवित आहे. या ऑपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात १ अधिकारी व २ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस आपापल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बसस्थानक, रुग्णालये, उद्यान, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क साधतात. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्वयंसेवी संस्थांचीही मदत मिळणे अवश्य आहे. १ ते ३० जून या महिन्याभरात राबविलेल्या १० व्या ऑपरेशन मुस्कानमध्ये सात बालकांना शोधण्यात गोंदिया पोलिसांना यश आले आहे. आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत दोन मुली, गोंदिया शहर एक मुलगा, गोरेगाव दोन मुली, गंगाझरी दोन मुली अशा सातजणांचा शोध घेण्यात आला आहे. या १० व्या ऑपरेशन मुस्कानला यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस हवालदार भुवन देशमुख व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
..................
त्यांचे जीवन फुलायला हवे
बेपत्ता किंवा अपरहण झालेल्या बालकांना त्यांच्या माता-पित्याच्या स्वाधीन करण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात येते. परंतु ऑपरेशन मुस्कानमध्ये जी बालके सापडतात आणि त्यांचे आई-वडील नाहीत किंवा असतील तर ते सांभाळायला तयार नसतील, अशा बालकांना सुधारगृहात टाकले जाते. त्यांची स्थिती या अभियानानंतरही तशीच राहते. त्यांचे जीवन फुलविण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.