गोंदिया : १६ जानेवारीपासून अवघ्या देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिला डोज घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोज घ्यावा लागणार घ्यावा लागणार आहे. अशात जिल्ह्यात पहिल्या दिवशी लस घेणाऱ्या २१३ कोरोना वॉरियर्सला सोमवारी (दि.१५) दुसरा डोज दिला जाणार आहे.
कोरोना लसीला मंजुरी दिल्यानंतर, देशात १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या लसीकरणांतर्गत सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असे ठरले आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ८,४२८ आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली व पहिल्या दिवशी म्हणजेच, १६ जानेवारी त्यांच्यापासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यात पहिल्या दिवशी ३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्याचे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाने केले होते. यासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालय, तिरोडा येथील उप जिल्हा रुग्णालय व देवरी येथील ग्रामीण रुग्णालय अशा ३ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन होते. मात्र, पहिल्या दिवशी येथील वैद्यकीय महाविद्यालयात ६४, तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात ८५ तर देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात ६४ आरोग्य कर्मचाऱ्यांना म्हणजेच एकूण २१३ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. आता या २१३ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोज घेऊन २८ दिवसांचा कालावधी पूर्ण होणार आहे. अशात सोमवारपासून (दि.१५) लसीचा दुसरा डोज दिला जाणार असल्याने सर्वप्रथम या २१३ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोज दिला जाणार आहे. त्यानंतर, आता सुरू असलेल्या लसीकरणानुसार लस घेणाऱ्यांना दुसरा डोज दिला जाणार आहे.
------------------------------
१४ दिवसांनी तयार होणार अँटीबॉडीज’
लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोज घ्यायचा आहे. त्यानंतर, १४ दिवसांनी शरीरात कोरोनाशी लढा देणाऱ्या ‘अँटीबॉडीज’ तयार होणार, असा हा लसीचा फॉर्म्युला आहे. यामुळे आता सोमवारपासून दुसरा डोज घेणाऱ्यांमध्ये २८ फेब्रुवारीनंतर ‘अँटीबॉडीज’ तयार होणार व ते कोरोनाच्या धोक्यापासून सुरक्षित होणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.