गोंदिया : व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेमप्रकरणे व अनैतिक संबंध यातून पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. मागील सव्वा वर्षापासून कोरोनाने कहर केला. या कोरोनामुळे घरात पती-पत्नीत वाद हाेऊ लागल्याने वैवाहिक जीवनात विष कालवले जात आहे.
सन २०२० च्या मार्चपासून आतापर्यंत पोलिसांच्या भरोसा सेलकडे ३७६ तक्रारी आल्या आहेत. सन २०२० मध्ये २९१ तक्रारी, तर सन २०२१ च्या मेपर्यंत ८५ तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या. मार्च २०२० पासून १२५ पती-पत्नीचा वाद भरोसा सेलने मिटविला. त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला.
सन २०२० या वर्षात २९१ तक्रारींपैकी १०० प्रकरणांत समेट घडवून आणले. जानेवारी ते मे २०२१ या वर्षातील ८५ तक्रारींपैकी २५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. पती-पत्नीच्या वादाचे महत्त्वाचे कारण मोबाइल होते. नोकरी गेली म्हणून पतीची असलेली व्यसनाधीनता, पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर घेतला जाणार संशय हा घराची शांती भंग करण्यास कारणीभूत होत असतो. यातून पती-पत्नीत क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून होणारे वाद विकोपाला जातात. त्यातून परिस्थिती हाताबाहेर जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत जात आहे. महिला किंवा पुरुषांकडून मोबाइलचा अतिवापर किंवा सोशल मीडियावर टाकलेली धूम ही सर्व कारणे पत्नी-पत्नीच्या संसाराला ग्रहण लागत आहेत.
..................................
१२५ पती-पत्नींची सोडविली भांडणे
-गोंदिया जिल्हा भरोसा सेलकडे मार्च २०२० पासून आतापर्यंत सन २०२० मध्ये २९१ तक्रारी, तर सन २०२१ च्या मेपर्यंत ८५ तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या.
-मार्च २०२० पासून १२५ पती-पत्नींचा वाद भरोसा सेलने मिटविला. त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला.
- पती-पत्नीच्या वादात भरोसा सेलच्या मध्यस्थीमुळे पती-पत्नीचा वाद मिटला. रडत आलेल्या महिला भरोसा सेलमुळे हसत पतीसोबत घरी परतल्या.
....................................
भरोसा सेलमध्ये मार्च २०२० पासून आलेल्या एकूण तक्रारी- ३७६
दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात आलेल्या तक्रारी- ३०
................................
नोकरी गेली म्हणून पैशापेक्षा चारित्र्याचे टेन्शन
कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे पुरुषवर्ग घरी बसला. कामाच्या नादात बायकोला वेळ न देणारे पुरुष बायकोसोबत तासन्तास घालवू लागल्याने काही दिवसांतच पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊ लागले. नोकरी गेल्याच्या टेन्शनपेक्षा चारित्र्याचे टेन्शन अधिक वाढू लागले.
.........
मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर
पती नोकरीवर जायचा, मुले शाळेत जायची, यामुळे घरात एकटी राहून काम आटोपल्यानंतर टीव्ही व मोबाइल वापरून आपली टाइमपास करणाऱ्या महिलांना मोबाइलचा नाद लागला. कोरोनामुळे पती घरात असल्यावरही त्यांच्या हातून मोबाइल सुटत नसल्यामुळे यातून पती-पत्नीत वाद झाला.
..................
क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून वाद
पती-पत्नी घरातच असल्याने आठवडा त्यांनी गुण्यागोविंदाने काढल्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून त्यांच्यात वाद होऊ लागले. परिणामी छोटे वाद घर उद्ध्वस्त होण्यापर्यंत पोहोचले. परंतु, भरोसा सेलने अनेक कुटुंबं सांभाळली.
........
कोट
व्यसनाधीनतेमुळे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे, त्यांना मारहाण करणे, क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून भांडण करणे मुला-मुलींच्या परिवारातील सदस्यांचा वाढलेला हस्तक्षेप हा वाद उद्भवतो. भरोसा सेलने दोन्ही पक्षातील लोकांना एकत्र बसवून त्यांच्यातील वाद मिटविला.
-उद्धव डमाळे, भरोसा सेल प्रमुख.