लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान अंतर्गत माध्यमिक विद्यालय नववी व दहावीला शिक्षण घेणाऱ्या अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने एएलपीच्या माध्यमातून मुलांना प्रगत करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. एएलपी अर्र्थात एक्सलेटर लर्निंग प्रोग्राम (जलदगतीने शिक्षण कार्यक्रम). या उपक्रमाच्या माध्यमातून नववीमधील प्रगत-अप्रगत विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या पध्दतीने प्रयोग करुन त्यांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणून खऱ्या अर्थाने दहावीचा निकाल शंभर टक्के लागावे म्हणून सरकारने पाऊल उचलले आहे. सालेकसा तालुक्यातील २१ माध्यमिक शाळांच्या प्रत्येकी तीन शिक्षकांना एएलपी प्रशिक्षण देण्यात आले. कावराबांध येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून टी.बी. बावनकुळे, सी.के. पुस्तोडे, एम.जी. कांबळे उपस्थित होते. गटसाधन केंद्रांतर्गत विषयतज्ज्ञ सुरेंद्र खोब्रागडे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात चाललेले दोन दिवसीय प्रशिक्षण हिंदी, मराठी, इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांवर जास्त भर देत आहे. अप्रगत विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करुन प्रवाहात आणण्यासाठी काही प्रयोगशील कृती कार्य करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इंग्रजी विषयावर मार्गदर्शन करताना दुरेक पध्दतीचा वापर करुन मुलांना अध्यापन करण्याबद्दल महत्वाचे मुद्दे सांगितले. भाषा विषयात मुलांना कसे बोलके करावे याबद्दल एम.जी. कांबळे यांनी प्रायोगिक पध्दतीने माहिती दिली. विज्ञान विषयाबद्दल मुलांची आवड वाढविण्यासाठी टी.बी. बावनकुळे यांनी माहिती दिली. प्रशिक्षणार्थी शिक्षकांमधून एन. रामटेके, मधुकर कुरसुंगे, सोनवाने व बिसेन या शिक्षकांनी अप्रगत मुलांना प्रवाहात आणण्याच्या टिप्स दिल्या. नियंत्रक विषयतज्ज्ञ सुरेंद्र खोब्रागडे यांनी प्रशिक्षणाचे महत्व आणि शिक्षकासमोर उभी होणारी आव्हाने याबद्दल मार्गदर्शन केले. समारोपाचे संचालन आर.आर. मिश्रा यांनी केले. आभार विजय मानकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2017 1:18 AM