गोंदिया : येथील कापगते कॉम्प्लेक्समध्ये २० दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या एका महिलेची हत्या झाली. मात्र अद्यापही तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. या हत्येमुळे नगरीतील रहिवाशांमध्ये दहशत कायम आहे.प्राप्त माहितीनुसार सतत वर्दळ असलेल्या कापगते कॉम्प्लेक्समध्ये ९ जुलै रोजी नितू सुरेश पशिने यांची भर दिवसा त्यांचे घरी हत्या झाली. हत्या झाल्याक्षणापासून पोलीस यंत्रणा मारेकऱ्यांच्या शोधकामात गुंतली. सीआयडी, स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस कामाला लागले परंतु अजुनपर्यंत ते मारेकऱ्यांचा शो तपास करू शकले नाही.हत्या झाल्याक्षणी चोरी अथवा दरोड्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र तपासात चोरी किंवा दरोडा असल्याचे निष्पन्न झाले नाही. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली. विविध पैलूंवर पोलीस तपास केला. मृतकाचे घरात एक कुत्रा आहे. तो सदैव अनोळखी व्यक्तींवर भुंकायचा. मात्र हा कुत्रा हल्ली भुंकत नसल्याचे दिसून आले. मारेकऱ्यांनी घटनास्थळी कुठलाही पुरावा सोडला नाही. मारेकऱ्यांनी हत्याराचा वापर केला ती हत्यारे शोधण्यासाठी पोलिसांनी मृतकाचे घरच्या विहिरीतील पाणी आटविले. मात्र याठिकाणी सुद्धा हत्यार सापडले नाहीत. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या श्वान पथकाने लाखांदूर-साकोली मार्गावरील टी-प्वार्इंट पर्यंतचा भाग दाखविला. तो पुढे जाऊ शकला नाही.पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळ्या चमू तयार केल्या आहेत. तपासकार्य अद्यापही सुरूच आहे. पोलिसांनी जनतेला या प्रकरणात सहकार्य करण्याचे आवाहन केले. नितू पशिने यांच्या हत्येसंबंधी काही उपयुक्त माहिती असल्यास लेखी स्वरुपात पाकीटमध्ये गुप्त पद्धतीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे.पोलिसांकडून नागरिकांना जाहीर आवाहननितू पशिने यांच्या हत्येसंबंधी नागरिकांना काही उपयुक्त माहिती असल्यास ती लेखी स्वरुपात पाकीटात गुप्तपणे द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयित व्यक्ती, घटनेच्या वेळेदरम्यान सकाळी १० ते दुपारी २ वाजतादरम्यान पशिने यांच्या घराच्या आत जाताना अथवा घरातून बाहेर पडताना एखाद्या व्यक्ती पाहिले असल्यास, त्यांच्या घराच्या आसपास कोणाला फिरताना पाहिले असल्यास, घटना प्रत्यक्ष पाहिली असल्यास, इतर काहीही गुन्ह्याबाबत महत्वाची माहिती असल्यास गुप्तपणे कळवावे. पाकिटावर त्यावर आपले नाव/ओळख लिहिण्याची आवश्यकता नाही, असे अर्जुनी मोरगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे. यातून काही सुगावा मिळविण्याचा प्रयत्न आहे.
महिलेच्या हत्येचे रहस्य अद्यापही कायम
By admin | Published: July 31, 2015 2:03 AM