गोंदिया : अवैधरित्या दारूविक्री करीत असलेल्या तिघांच्या घरावर धाड घालून पोलिसांनी ६ हजार ३६० रुपयांची दारू पकडली आहे. चिचगड पोलिसांनी ९ व १० एप्रिल रोजी ही कारवाई केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असताना दारूविक्रीस बंदी आहे. तरीदेखील मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. यावर चिचगड पोलिसांनी गावात ९ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वाजता आरोपीच्या घरावर धाड घालून माजघरातील कोपऱ्यात एका बोरीत ठेवलेल्या दोन हजार ८८० रुपये किमतीच्या १८० मिलिच्या देशी दारूच्या ४८ बॉटल्स जप्त केल्या. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मनोहर इस्कापे यांनी केली आहे. दुसरी कारवाई १० एप्रिल रोजी मध्यरात्री करण्यात आली असून आरोपीच्या घरातील स्वयंपाकखोलीत एका कोपऱ्यात प्लास्टिक थैलीत ठेवलेल्या एक हजार ८०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३० बॉटल्स पोलिसांनी जप्त केल्या.
तर तिसरी कारवाई १० एप्रिल रोजी मध्यरात्री करण्यात आली. आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता छपरीत एका पिशवीत ठेवलेल्या एक हजार ६८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २८ बॉटल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तिघांवर चिचगड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.