नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशी गोवंशाचा दर्जा वाढ करण्यासाठी जास्त दूध देणाऱ्या गोवंशाकडून कृत्रीम रेतन करून त्यांची दूध क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने एचवायआयव्ही या उपक्रमाची सुरूवात केली. या उपक्रमासाठी गोंदिया जिल्ह्यातील २१९ गावांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत १०० व दुसऱ्या फेरीत ११९ अशा एकूण २१९ गावांची निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यातील देशी गार्इंना फळवून त्यातून जन्माला येणाऱ्या गाई अधिक दूध देतील व जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढेल, या उद्देशातून उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी १५ सप्टेंबर २०१९ पासून पहिली फेरी सुरू करण्यात आली होती. तर दुसरी फेरी १ जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पशूसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी वंधत्व निवारण व कृती शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते.शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून वंधत्व निवारणाचे उपाय करून कृत्रीम रेतनाचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहेत. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन हजार २१७ जनावरांचे कृत्रीम रेतन करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्येक गावातून गाई फळविण्याचे काम केले जात आहे.शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, जास्त दूध देणाऱ्या जनावरांची संख्या वाढावी, यातून देशी गार्इंवर कृत्रीम रेतन करून जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निर्मिती करून त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक समाधान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.गोंदिया जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या अशा दोन टप्यात २१९ गावांची निवड करण्यात आली आहे.यात गोंदिया तालुक्यातील ७१ गावे, आमगाव तालुक्यातील २८ गावे, सालेकसा तालुक्यातील १५ गावे, देवरी तालुक्यातील ३१ गावे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २० गावे, सडक-अर्जुनी तालुक्यातील १० गावे, गोरेगाव १९ गावे व तिरोडा तालुक्यातील २५ गावांचा समावेश आहे.२१ हजार ९०० जनावरांच्या कृत्रीम रेतनाचे उद्दिष्टदूग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रीम रेतन करण्यासाठी निवड झालेल्या प्रत्येक गावातील १०० जनावरांचे कृत्रीम रेतन करण्याचे उद्दिष्ट आहे. गोंदिया जिल्ह्यातील २१ हजार ९०० गायी किंवा म्हशींचे कृत्रीम रेतन करायचे आहे. नियमित माजावर येणारी जनावरे व गोवंश उच्च जातीच्या विर्यकांड्याने कृत्रीम रेतनाद्वारे फळवून व माजावर न येणाऱ्या वंधत्व असलेल्या जनावरांचे उपचार करून त्यांनाही या प्रक्रियेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पशू पालकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.या योजनेपासून देशी गोवंश कालवडी या उच्च दुग्ध उत्पादन क्षमतेच्या राहणार आहेत. त्याचा निश्चित पशू पालकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे जास्तीतजास्त कृत्रीम रेतन करावे.-राजेश वासनिक,जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी, जि.प.गोंदिया.
दुग्ध उत्पादन वाढीसाठी २१९ गावांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 6:00 AM
शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, जास्त दूध देणाऱ्या जनावरांची संख्या वाढावी, यातून देशी गार्इंवर कृत्रीम रेतन करून जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निर्मिती करून त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक समाधान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.
ठळक मुद्देदेशी गोवंशाला उच्च दर्जाचे कृत्रीम रेतन । प्रत्येक गावातील १०० जनावरे घेणार