पोवारीटोला येथील चमत्कारिक मूर्त्या : ३२ वर्षांपूर्वी गुराख्याच्या पायांना झाला स्पर्श विजय मानकर सालेकसा तालुक्यातील पोवारीटोला (कोटजमुरा) येथे ३२ वर्षांपूर्वी स्वयंभू प्रगट झालेले आदिनाथ ओंकारेश्वर आणि त्यांचे वाहन वृषभदेव यांचे शिवालय सतत दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे. एका छोट्याशा गावात या मूर्त्या प्रगट झाल्याने तसेच त्या गावाची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असल्याने येथे ओंकारेश्वर भगवंताला यथेस्ट स्थान मिळू शकले नाही. त्याचप्रमाणे सुदूर ग्रामीण भागात असलेला पोवारीटोला गाव मुख्य मार्गापासून दूर असल्याने याकडे बलाढ्य शिवभक्त किंवा समर्पित शिवभक्ती करणाऱ्या भाविकांच्या नजरेपासूनही दूरच राहिला. हेच ठिकाण शहरालगत किंवा वर्दळीच्याच्या परिसरालगत असते तर या मूर्त्यांसमोर हजारो लोक नियमित नतमस्तक झाले असते. भव्यदिव्य शिवालय मंदिरसुद्धा त्यांना सुशोभित करता आले असते व आज मोठ्या प्रसिद्धीच्या झोतात आले असते, असे या ओंकारेश्वर भगवंताच्या मूर्तीकडे बघून वाटते. पोवारीटोला येथील गुराखी गोरेलाल सोनवाने हे नेहमी गावातील गाई बैलांना गावाजवळील तलावालगत परिसरातील कुरणावर चारण्यासाठी नेत असायचे. गाई चारत असताना तलावाजवळ एका उंच ठिकाणी जावून बसून राहायचे. सन १९८४ च्या आॅक्टोबर महिन्यात त्यांच्या लक्षात आले की, ज्या ठिकाणी ते रोज बसतात ते ठिकाण दिवसेंदिवस उंच होत आहे. १४ आॅक्टोबर १९८४ रोजी ते गाई चारण्यासाठी जात असताना त्याच ठिकाणी त्यांच्या पायाला नंदीचा स्पर्श झाला. ते शिवजीनंदी हळूहळू जमिनीबाहेर वर येत असल्याचे लक्षात आले. ही माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिली. तेव्हा सर्व गावकऱ्यांसमोर सायंकाळी ४.१५ वाजता नंदीची मूर्ती प्रगट झाली. लगेच दुसऱ्या दिवशी १५ आॅक्टोबर १९८४ रोजी सोमवारला आदिनाथ ओंकारेश्वर भगवंताची मूर्ती त्याच ठिकाणालगत प्रगट झाली. तो दिवस सोमवारचा अर्थात भगवान शिवजीचा असून सकाळी ९.१५ वाजता मूर्ती प्रगट झाली. गावातील लोकांसह परिसरातील लोकांना मोठा चमत्कार घडल्याचे प्रत्यक्ष अनुभवले. गावातील लोकांनी याबाबत सर्वत्र माहिती दिली. लोक एकत्रित झाले. त्या ठिकाणी आणखी मूर्त्या असतील का? याबाबत विचारविमर्श केला. त्या ठिकाणी खोदकामाचा प्रयत्न करण्यात आला. बुधवार हा गजानन महाराजांचा दिवस असून १७ आॅक्टोबर १९८४ ला बुधवारी सकाळी १०.१५ वाजता श्री लंबोदर गणेश भगवान यांची मूर्ती सापडली. तेव्हा लोकांना आणखी चमत्काराशिवाय काहीच वाटत नव्हते. त्याच ठिकाणी खोदकाम केल्यानंतर शिवलिंग सापडले. अशाप्रकारे चमत्कारिकरित्या आदिपुरूष ओंकारेश्वर, भगवात गजानन, नंदी आणि शिवलिंग प्रगट झाले. गावातील लोकांनी या सर्व मूर्त्यांची विधीविधानानुसार पूजा केली व मंदिर बांधून तेथे त्यांना स्थान देण्याचे ठरविले. गावातील व परिसरातील लोकांनी यथाशक्ती एक छोटेसे शिवालय बनवून दिले. तेथे त्यांना स्थापित केले. काही शिवभक्त तेथे नियमित पूजा करू लागले. दरवर्षी शिवरात्रीला जत्रा सुरू करण्यात आली. परंतु लोकसहभाग कमी झाल्याने तसेच लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष दिले नसल्याने या चमत्कारिक मूर्त्या दुलर्क्षित राहिल्या आहेत. या ठिकाणी भव्यदिव्य मंदिर व्हावे, अशी अपेक्षा लोकांची आहे. परंतु यासाठी नव्या दमाने कुणाला तरी पुढाकार घेण्याची गरज आहे.
स्वयंभू ओंकारेश्वर शिवालय दुर्लक्षित
By admin | Published: August 15, 2016 12:23 AM