या चर्चासत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे कमी झालेले आरक्षण पदोन्नतीत मागासवर्गीयांवर होत असलेला अन्याय, महाराष्ट्रात काही जिल्ह्यात ओबीसीचे १९ टक्के पेक्षा कमी झालेले आरक्षण, आर्थिक विकास महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करणे, महाज्योतीच्या समस्या, ओबीसीची जनगणना करणे या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याचे महासंघाचे केंद्रीय सरचिटणीस प्रा. नामदेव हटवार यांनी प्रास्ताविकातून सांगितले. चर्चासत्रात भाग घेताना प्रा. रमेश पिसे यांनी ओबीसीसाठी निर्माण केलेल्या महाज्योतीला सरकार कमी रुपयांची तरतूद करणे, तसेच १२४ कोटी मंजूर झालेले रुपये सुद्धा सरकारने परत घेतल्याचे सांगितले. काही लोक सारथी व महाज्योतीचा एकत्रित लाभ घेत असल्याचेही म्हटले. ॲड. धनराज वंजारी वर्धा यांनी तेली समाजाने आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले पाहिजे असे मत व्यक्त केले. रामराव क्षीरसागर यांनी तेली समाजाने स्वत:च्या आरक्षणासाठी लढले पाहिजे असे सांगितले. डॉ. प्रकाश देवतळे अमरावती यांनी ओबीसीच्या डाटा, जनगणना आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. सोमेश्वर वंजारी यांनी आजपर्यंत प्रत्येक सरकारने ओबीसीची दिशाभूल केल्याचे सांगितले. विलास काळे यवतमाळ यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. संतोष खोब्रागडे, गोंदिया, वनिता वनकर, मिनाक्षी गुजरकर, सूर्यकांत खनके चंद्रपूर, निलकंठराव पिसे वर्धा, राजाराम वंजारी पुणे, प्राचार्य अरुण झिंगरे साकोली, प्रकाश भूरे भंडारा, डॉ. पुरुषोत्तम बोरकर, डॉ. जगदीश हटवार यांनीही चर्चासत्रात सहभाग घेतला. चर्चासत्राचे संचालन शहर सरचिटणीस संजय नरखेडकर व आभार शहर अध्यक्ष संजय शेंडे यांनी केले.
ओबीसीच्या आरक्षणावर विदर्भ तेली समाज महासंघाचे चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:38 AM